दापोली : पोलिसांची मोठी कारवाई, नवी मुंबईतील फरारी आरोपीला गोपनीय माहितीच्या आधारे केली अटक

banner 468x60

कोपरखैरणे पोलीस ठाणे, नवी मुंबई येथे दाखल असलेल्या फसवणूक व बनावट कागदपत्र तयार केल्याप्रकरणी सात वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला दापोली पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे अटक करून मोठे यश मिळविले आहे. या कारवाईत स्थानिक पोलीस पाटील यांनीही महत्त्वाची मदत केली.

कोपरखैरणे पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक ३१६/२०१९ अन्वये भारतीय दंड संहितेच्या कलम ४२०, ४०६, ४६४, ४६७, ४६८ व ३४ अंतर्गत गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी शाम काशीनाथ सपकाळ हा अनेक दिवसांपासून फरार होता.

सदर आरोपी न्यायालयात हजर राहत नसल्याने बेलापूर, नवी मुंबई येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी त्याला फरारी आरोपी म्हणून घोषित केले होते. त्याचा शोध घेण्यासाठी कोपरखैरणे पोलीस प्रयत्नशील होते.

दरम्यान, आरोपी दापोली तालुक्यात वास्तव्यास असल्याची गोपनीय माहिती दापोली पोलिसांना मिळाली. त्यानुसार दापोली पोलिसांनी स्थानिक पोलीस पाटील यांच्या सहकार्याने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्यानंतर आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आरोपीला पुढील कारवाईसाठी कोपरखैरणे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

या यशस्वी कारवाईमुळे फरार आरोपींचा शोध घेण्याबाबत दापोली पोलिसांची कार्यक्षमता पुन्हा अधोरेखित झाली असून, या कारवाईचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *