चिपळूण : सावर्डे रेल्वे स्थानकावर प्रवासी पादचारी उड्डाणपुलाला मंजुरी, प्रवासी संघटना व आमदार शेखर निकम यांच्या पाठपुराव्याला यश

banner 468x60

चिपळूण तालुक्यातील महत्त्वाच्या कोकण रेल्वेच्या सावर्डे रेल्वे स्थानकावरील प्रवाशांच्या दीर्घकालीन मागणीला अखेर यश आले असून, स्थानकात प्रवासी पादचारी उड्डाणपूल (Foot Over Bridge) उभारण्यास रेल्वे प्रशासनाने मंजुरी दिली आहे. सुमारे १ कोटी ६० लाख रुपये खर्चाच्या या कामाला मंजुरी मिळाल्याने परिसरातील प्रवाशांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

सावर्डे रेल्वे स्थानकावर फलाट क्रमांक १ वर प्लॅटफॉर्मची सुविधा असली तरी फलाट क्रमांक २ वर प्लॅटफॉर्म नसल्याने प्रवाशांना रेल्वेतून थेट जमिनीवर, चिखल व गवतामध्ये उतरावे लागत होते. तसेच एका फलाटावर गाडी उभी असल्यास दुसऱ्या फलाटावर जाण्यासाठी प्रवाशांना मोठी कसरत करावी लागत होती. यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांना विशेषतः मोठा त्रास सहन करावा लागत होता.

या समस्यांबाबत कोकण रेल्वे सावर्डे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष सचिन कोल्हापुरे आणि संघटनेच्या सदस्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. तसेच आमदार शेखर निकम यांनी रेल्वे प्रशासनाकडे हा प्रश्न प्रभावीपणे मांडत पाठपुरावा केल्याने अखेर फलाट क्रमांक १ ते फलाट क्रमांक २ जोडणाऱ्या प्रवासी पादचारी उड्डाणपुलाच्या कामाला मंजुरी मिळाली. मंजुरीचे अधिकृत पत्र नुकतेच अध्यक्ष सचिन कोल्हापुरे यांना प्राप्त झाले आहे.

मात्र, स्थानकावरील अन्य समस्या अद्याप कायम आहेत. फलाट क्रमांक १ वर केवळ अंशतः शेड असल्याने बहुतांश प्रवाशांना पावसात व उन्हात उभे राहावे लागते. तर फलाट क्रमांक २ वर ना प्लॅटफॉर्म आहे, ना प्रवाशांसाठी शेडची सुविधा. त्यामुळे पंचक्रोशीतील सुमारे ६० गावांतील रेल्वे प्रवाशांना अनेक वर्षांपासून मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे.

प्रवासी संघटनेने या सर्व सुविधांसाठी वेळोवेळी रेल्वे प्रशासनाकडे मागणी केली असली तरी अपेक्षित प्रतिसाद मिळत नव्हता. मात्र, उड्डाणपुलाला मंजुरी मिळाल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला असून, प्रवाशांनी प्रवासी संघटना आणि आमदार शेखर निकम यांचे आभार व्यक्त केले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *