दापोलीत पुन्हा खळबळ POCSOचा गंभीर गुन्हा दाखल, अल्पवयीन मुलगी गर्भवती, जुलै महिन्यात दापोली तालुक्यात नोंद झालेला हा चौथा गुन्हा

banner 468x60

दापोली तालुक्यात अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ होत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. १० जुलै रोजी दापोली पोलीस ठाण्यात संरक्षण ऑफ चिल्ड्रेन फ्रॉम सेक्सुअल ऑफेन्सेस (POCSO) कायद्यांतर्गत आणखी एका गंभीर गुन्ह्याची नोंद करण्यात आली. या प्रकरणात पीडित अल्पवयीन मुलगी गर्भवती असल्याची बाब समोर आल्याने तालुक्यात संताप आणि चिंता व्यक्त केली जात आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित गुन्हा १० जुलै रोजी रात्री ११ वाजून ३९ मिनिटांनी दापोली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला. या प्रकरणी निखील पांडुरंग चोगले (वय २७, रा. पाजपंढरी, गरजेबाबा, ता. दापोली, जि. रत्नागिरी) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
जानेवारी २०२६ ते ८ एप्रिल २०२६ या कालावधीत पाजपंढरी येथील आपल्या राहत्या घरी अल्पवयीन पीडितेशी वारंवार शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप आहे. या प्रकारानंतर पीडिता गर्भवती राहिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १३७/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम ६४, ६५(२), POCSO कायद्याचे कलम ४(२), ६, ८ तसेच बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २०२६ चे कलम ९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

विशेष म्हणजे, जुलै महिन्यात दापोली तालुक्यात नोंद झालेला हा चौथा POCSO गुन्हा आहे. धक्कादायक बाब म्हणजे, जुलैच्या पहिल्याच आठवड्यात अवघ्या चार दिवसांत तीन POCSO गुन्हे नोंदविण्यात आले होते. त्यानंतर लगेचच चौथे प्रकरण समोर आल्याने कायदा व सुव्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेबाबत चिंता वाढली आहे.

दरम्यान, वाढत्या अत्याचारांच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर आरोपींवर कठोर कारवाई करण्याची आणि अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना राबविण्याची मागणी केली आहे .

दापोलीसारख्या शांत आणि शैक्षणिक वातावरणासाठी ओळखल्या जाणाऱ्या तालुक्यात अशा घटनांची वाढ ही अत्यंत गंभीर बाब मानली जात असून, केवळ दापोलीच नव्हे तर संपूर्ण रत्नागिरी जिल्हा आणि राज्यासाठीही ही धोक्याची घंटा असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *