Breaking News
दाभोळ अत्याचार प्रकरण : अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी संशयित आरोपीला 13 जुलैपर्यंत 5 दिवसांची पोलीस कोठडी ​दापोलीत धक्कादायक प्रकार 7 वर्षांच्या चिमुरडीवर हॉटेलच्या किचनमध्ये अत्याचार, 50 वर्षीय नराधम किशोर पटेल विरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल मंडणगड : आंबेत खाडीतील अडकलेल्या दोन्ही बार्ज हटवण्यात यश, म्हाप्रळ-आंबेत पुलावरील वाहतूक पुन्हा सुरू संगमेश्वर : मुंबई-गोवा महामार्गाच्या खोदाईचा फटका, दरड कोसळली, कोळंबेतील कमळजाबाई हायस्कूलवर दरडीचे संकट, 400 विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका चिपळूण: वशिष्ठी नदीच्या वाढत्या पाण्यात अडकलेल्या कुटुंबाची सुटका, पालिका प्रशासनाच्या तत्परतेमुळे टळली दुर्घटना

​दापोलीत धक्कादायक प्रकार 7 वर्षांच्या चिमुरडीवर हॉटेलच्या किचनमध्ये अत्याचार, 50 वर्षीय नराधम किशोर पटेल विरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

banner 468x60

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील वळणे एमआयडीसी परिसरात सात वर्षीय चिमुरडीवर कथित लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ आणि बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पोक्सो) कायद्यानुसार गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करीत आहेत.

banner 728x90

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ जुलै २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास पीडित अल्पवयीन मुलगी तिच्या भावासोबत वळणे एमआयडीसी परिसरातील ‘भोलेनाथचा आधार’ हॉटेलमध्ये वडापाव घेण्यासाठी गेली होती. त्यावेळी हॉटेलमध्ये काम करणाऱ्या आरोपीने मुलीच्या भावाला पाणी आणण्याच्या कारणाने बाहेर पाठवलं. त्यानंतर अल्पवयीन मुलीला हॉटेलच्या स्वयंपाकघरात नेऊन दरवाजा बंद करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

घरी परतल्यानंतर मुलीने घडलेला प्रकार कुटुंबीयांना सांगितल्यानंतर त्यांनी तातडीने दापोली पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. तक्रारीची दखल घेत दापोली पोलीसांनी गुन्हा रजिस्टर क्रमांक १३५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ६४(१), ६४(२)(i), ६५(२) तसेच पोक्सो कायद्याच्या कलम ४(२), ८ आणि १० अंतर्गत गुन्हा नोंदविला.


या प्रकरणातील आरोपी किशोर भगवानजी पटेल (वय ५०) हा मूळचा देवपर, तालुका नखतराणा, जिल्हा भुज (गुजरात) येथील असून, सध्या वळणे एमआयडीसी, ता. दापोली, जि. रत्नागिरी येथे वास्तव्यास असल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे.

या गुन्ह्याची नोंद पोलीस हवालदार जाधव यांनी केली असून, तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हिरेमठ यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. दापोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश तोरसकर यांनीही प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. घटनास्थळावरील पुरावे, साक्षीदारांचे जबाब आणि इतर तांत्रिक बाबींची पडताळणी करण्यात येत असून, तपास वेगाने सुरू आहे.

पोलीसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यातील कलमांनुसार हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा गुन्हा मानला जातो. भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४(१) आणि ६४(२)(i) अंतर्गत किमान दहा वर्षांपासून आजीवन सश्रम कारावासाची तरतूद आहे. तर कलम ६५(२) अंतर्गत किमान वीस वर्षांचा कारावास किंवा आजीवन कारावासाची तरतूद आहे. याशिवाय पोक्सो कायद्यातील कलम ४(२), ८ आणि १० अंतर्गतही कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.

या घटनेमुळे दापोली तालुक्यात संताप व्यक्त होत असून, अल्पवयीन मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. दरम्यान, या प्रकरणाचा अधिक तपास दापोली पोलीस करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *