मुंबई-गोवा महामार्गावरील रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील भोस्ते घाटात धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. घाटातील एका अवघड वळणावर महामार्गाच्या दरीकडील बाजूचा रस्ता वेगाने खचत असून नुकत्याच बांधण्यात आलेल्या सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याला अनेक ठिकाणी मोठ्या आणि खोल भेगा पडल्या आहेत. त्यामुळे या मार्गावरील प्रवास धोकादायक बनल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

रस्त्याला पडलेल्या भेगा बुजवण्यासाठी संबंधित ठेकेदाराकडून तातडीने सिमेंट भरून तात्पुरती दुरुस्ती करण्यात आली आहे. मात्र, ही केवळ मलमपट्टी ठरत असून जमिनीची आतून खचण्याची प्रक्रिया अद्यापही सुरू असल्याचे दिसून येत आहे. दिवसेंदिवस भेगा अधिक रुंदावत असून दरीकडील मातीसह रस्त्याचा भाग खाली सरकत असल्याने वाहनचालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. सततच्या पावसामुळे या ठिकाणी कधीही मोठे भूस्खलन होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, वेळेत उपाययोजना न झाल्यास महामार्गाचा काही भाग दरीत कोसळून वाहतूक पूर्णपणे ठप्प होण्याचा धोका आहे. तसेच मोठी जीवितहानी होण्याचीही भीती व्यक्त केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी भोस्ते घाटातून अत्यंत सावधगिरीने प्रवास करावा, असे आवाहन करण्यात येत आहे. दरम्यान, कोणतीही दुर्घटना घडण्यापूर्वी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि संबंधित प्रशासनाने या धोकादायक ठिकाणी तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिक आणि प्रवाशांकडून केली जात आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













