रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने आणि वादळी वाऱ्याने लांजा तालुक्याला मोठा फटका बसला आहे. शहरासह ग्रामीण भागात अनेक ठिकाणी वड, आकेशी, आंबा तसेच इतर मोठी रानटी झाडे रस्त्यांवर कोसळल्याने वाहतुकीची मोठी कोंडी झाली. काही मार्गांवरील वाहतूक तासन्तास ठप्प राहिली. झाडे हटविण्यासाठी स्थानिक नागरिक, प्रशासन आणि संबंधित यंत्रणांना मोठी कसरत करावी लागली.
गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे तालुक्यातील अनेक भाग जलमय झाले आहेत. शेतांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने भातशेतीसह इतर पिकांचे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. सततच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून नागरिकांना दैनंदिन कामकाजासाठीही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
राष्ट्रीय महामार्गावरील लांजा येथे नव्याने उभारण्यात येणाऱ्या पुलाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यातच तात्पुरत्या मार्गावरील पुलाच्या प्लेटा निसटल्याने वाहनचालकांना मोठा धोका निर्माण झाला आहे. या प्रकारामुळे नागरिकांनी प्रशासन आणि संबंधित कंत्राटदाराविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली असून पुलाचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी जोर धरत आहे.
वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांवरील पत्रे उडून गेली असून काही ठिकाणी मोठी झाडे घरांवर कोसळल्याने घरांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने जीवितहानीची कोणतीही घटना घडली नसली तरी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच वीजवाहिन्यांवर झाडे कोसळल्यामुळे अनेक भागातील वीजपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून लांजा शहर आणि ग्रामीण भागात वीजपुरवठ्याचा अक्षरशः लपंडाव सुरू आहे. दिवसभरात अनेक वेळा वीज खंडित होत असल्याने घरगुती आणि व्यावसायिक कामांवर गंभीर परिणाम होत आहे. वीज नसल्यामुळे नळांना पाणी येत नाही, मोबाईल चार्ज करता येत नाहीत, तसेच टीव्ही, फ्रिज, पंखे, मिक्सर, पिठाच्या चक्कीसह अनेक विद्युत उपकरणे बंद पडली आहेत.
शेतकऱ्यांनाही या परिस्थितीचा मोठा फटका बसत आहे. दिवसभर शेतात काम करून रात्री अंधारातच उर्वरित कामे करण्याची वेळ त्यांच्यावर येत आहे. सततच्या वीजखंडितीमुळे शेतीसाठी आवश्यक असलेली अनेक कामेही खोळंबली आहेत.
“हजारो रुपयांची वीजबिले भरूनही नियमित वीज मिळत नसेल तर अशा सेवेचा उपयोग काय?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. वारंवार होणाऱ्या वीजखंडितीमुळे महावितरणच्या कारभाराविरोधात नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असून तातडीने वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी जोर धरत आहे.
दरम्यान, हवामान विभागाने पुढील काही दिवस जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा दिल्याने प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. अनावश्यक प्रवास टाळावा, पडझड झालेल्या झाडांपासून दूर राहावे आणि आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













