रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना उद्या ( 6 जुलै) सुट्टी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

banner 468x60

रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेली पूरस्थिती आणि हवामान विभागाने दिलेला अतिवृष्टीचा इशारा लक्षात घेता, जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. उद्या सोमवार, दि. ६ जुलै २०२६ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

यासंदर्भातील अधिकृत आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष मनुज जिंदल यांनी जारी केले आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत कोणताही धोका टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

सध्या जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. खेड तालुक्यातील जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून, चिपळूण येथील वशिष्ठी नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. अनेक रस्ते पाण्याखाली गेले असून काही ठिकाणी वाहतुकीवरही परिणाम झाला आहे.

प्रशासनाच्या आदेशानुसार ही सुट्टी अंगणवाड्यांपासून ते महाविद्यालयांपर्यंतच्या सर्व शैक्षणिक संस्थांना लागू राहणार आहे. यात सरकारी, खाजगी, जिल्हा परिषद, नगरपालिका, अनुदानित, विनाअनुदानित शाळा, आश्रमशाळा तसेच व्यावसायिक प्रशिक्षण केंद्रांचा समावेश आहे.

जिल्हा प्रशासनाने सर्व संबंधित विभाग आणि शैक्षणिक संस्थांना आदेशाची तातडीने अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या असून, नागरिकांनीही आवश्यक असल्याशिवाय घराबाहेर पडू नये आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *