रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला, 24 तासांत 103.52 मिमी सरासरी पाऊस, 5 जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट

banner 468x60

रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने जोरदार पुनरागमन केले असून, गेल्या २४ तासांत मुसळधार पावसाने संपूर्ण जिल्ह्याला अक्षरशः झोडपून काढले आहे. जिल्हा नियंत्रण कक्षाच्या माहितीनुसार, ३० जून रोजी सकाळी संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात १०३.५२ मिमी सरासरी पावसाची नोंद झाली आहे. यंदाच्या हंगामात आतापर्यंत जिल्ह्यात ५३५.३८ मिमी पाऊस झाला आहे.

banner 728x90

जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये पावसाचा जोर कायम असला तरी रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक १४३.७७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्याखालोखाल गुहागरमध्ये १२७.६० मिमी आणि मंडणगडमध्ये १२०.२५ मिमी पाऊस झाला. खेड तालुक्यात सर्वात कमी ६५.१४ मिमी पावसाची नोंद झाली असली तरी तेथेही पावसाची संतोषजनक हजेरी लागली आहे.

रविवार रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने सोमवार आणि मंगळवारीही जोर कायम ठेवला. अनेक ठिकाणी दिवसभर संततधार सुरू असल्याने नद्या-नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. सखल भागात पाणी साचण्याच्या घटना घडत असून, काही ठिकाणी लहान-मोठे ओढे आणि पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

या दमदार पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. पावसाअभावी रखडलेल्या भातलावणीच्या कामांना आता वेग येणार असून, खरीप हंगामाला मोठा दिलासा मिळाला आहे. शेतीसाठी आवश्यक असलेली ओल निर्माण झाल्याने बळीराजा समाधान व्यक्त करत आहे.

मात्र, दुसरीकडे सततच्या मुसळधार पावसामुळे जनजीवनावर परिणाम होऊ लागला आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीचा वेग मंदावला असून, काही ग्रामीण भागांतील रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहनचालकांना सावधगिरीने प्रवास करावा लागत आहे. डोंगराळ भागात दरड कोसळण्याचा धोका वाढला असून, प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.

दरम्यान, हवामान विभागाने रत्नागिरी जिल्ह्यासाठी ५ जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या कालावधीत जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, नदी-नाले व समुद्रकिनारी जाणे टाळावे तसेच प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

पावसाचा जोर पुढील काही दिवस कायम राहण्याची शक्यता असल्याने प्रशासन सतर्क झाले असून, आपत्कालीन यंत्रणांनाही सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *