दापोली : ट्रकच्या धडकेत माकड जखमी, बुरोंडीतील सचिन नरळकर यांच्या प्रसंगावधानाने वाचले प्राण

banner 468x60

दापोली तालुक्यातील बुरोंडी येथे माणुसकीचा हृदयस्पर्शी अनुभव देणारी घटना घडली. भरधाव ट्रकच्या धडकेत एक माकड गंभीर जखमी झाले. धडक इतकी जोरदार होती की माकड रस्त्याच्या कडेला बेशुद्ध अवस्थेत पडले होते. अपघातानंतर ट्रकचालक न थांबता पुढे निघून गेल्याचे स्थानिकांनी सांगितले.

ही घटना पाहताच बुरोंडी येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन नरळकर यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमी माकडाला सुरक्षित ठिकाणी हलवले, त्याला पाणी पाजले आणि त्याची काळजी घेतली. काही वेळाने माकडाला शुद्ध आली आणि त्याच्या हालचाली सुरू झाल्याने उपस्थित नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला.

या घटनेमुळे परिसरात काही काळ नागरिकांची गर्दी झाली होती. सचिन नरळकर यांनी दाखवलेल्या संवेदनशीलतेचे आणि माणुसकीचे सर्वत्र कौतुक होत आहे. एखादा वन्यजीव जखमी झाल्यानंतर दुर्लक्ष करण्याऐवजी त्याला मदतीचा हात देण्याचा संदेश या घटनेतून मिळाला आहे.

बुरोंडी परिसरात माकडांचा वावर मोठ्या प्रमाणात असल्याने वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवून वाहन चालवावे, तसेच वन्यजीव रस्ता ओलांडत असताना विशेष खबरदारी घ्यावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. अशा घटनांमुळे वन्यजीवांचे प्राण धोक्यात येत असल्याने संबंधित यंत्रणांनीही जनजागृती करण्याची गरज व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *