दाभोळमध्ये नारळाच्या झाडावरून पडलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

banner 468x60

दाभोळ येथे नारळाच्या झाडावरून पडून गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. ही दुर्घटना २५ जून रोजी दुपारी १२ ते १ वाजण्याच्या दरम्यान घडली होती. चार दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर आज (२९ जून) सकाळी त्याची प्राणज्योत मालवली.

banner 728x90

मृत तरुणाचे नाव अमित जाधव (वय ३२) असे असून तो दाभोळ येथील दालभेश्वर पाखाडी परिसरातील रहिवासी होता. अमित हा आंबे आणि नारळ पाडण्याचे काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. २५ जून रोजी तो नेहमीप्रमाणे नारळ पाडण्यासाठी झाडावर चढला होता. मात्र, पावसामुळे झाडाचे खोड अत्यंत निसरडे झाले होते. झाडावर चढत असताना अचानक त्याचा तोल गेला आणि पाय घसरल्याने तो उंचावरून थेट जमिनीवर कोसळला.

या अपघातात अमितच्या डोक्यासह शरीराच्या विविध भागांना गंभीर दुखापत झाली. घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी तातडीने त्याला मदत करून दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर त्याची प्रकृती गंभीर असल्याने अधिक उपचारासाठी डेरवण येथील रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे वैद्यकीय उपचार सुरू असतानाच आज (२९ जून) सकाळी त्याचा मृत्यू झाला.

या घटनेमुळे दाभोळ परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मेहनती आणि मनमिळावू स्वभावामुळे अमित परिसरात परिचित होता. त्याच्या अकाली निधनाने नातेवाईक आणि ग्रामस्थांनी शोक व्यक्त केला आहे.

दरम्यान, पावसाळ्यात झाडांचे खोड शेवाळ आणि पावसाच्या पाण्यामुळे अत्यंत निसरडे होत असते. अशा परिस्थितीत नारळ, आंबा किंवा इतर उंच झाडांवर चढणे जीवघेणे ठरू शकते.

त्यामुळे अशा प्रकारची कामे शक्यतो पावसाळ्यात टाळावीत. अत्यावश्यक असल्यास सुरक्षा पट्टा, दोरी आणि इतर संरक्षणात्मक साधनांचा वापर करूनच काम करावे, तसेच कोणतीही जोखीम न घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *