रत्नागिरी : जिल्ह्यात डेंग्यू नियंत्रणात? सहा महिन्यांत 88 रुग्णांची नोंद, आरोग्य विभाग सतर्क

banner 468x60

रत्नागिरी जिल्ह्यात यंदा डेंग्यूचा प्रादुर्भाव नियंत्रणात असल्याचे चित्र आहे. आरोग्य विभागाने वेळोवेळी केलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजना, जनजागृती आणि सर्वेक्षण मोहिमेमुळे जानेवारी ते जून २०२६ या सहा महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यात केवळ ८ डेंग्यू रुग्णांची नोंद झाली आहे. या सर्व रुग्णांवर उपचार सुरू असून परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. संतोष यादव यांनी दिली.

banner 728x90

मान्सूनचे आगमन उशिराने झाले असले, तरी गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे साचलेले पाणी आणि वाढलेली आर्द्रता यामुळे डासांची उत्पत्ती वाढण्याची शक्यता असल्याने आरोग्य विभागाने सतर्कता वाढवली आहे. त्याच पार्श्वभूमीवर लांजा शहरात डेंग्यूचा एक रुग्ण आढळून आल्याने आरोग्य यंत्रणा अधिक दक्ष झाली आहे. मात्र, हा रुग्ण जिल्ह्याबाहेरून आलेला असल्याची माहिती आरोग्य विभागाने स्पष्ट केली आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत नोंद झालेल्या ८ रुग्णांपैकी केवळ २ रुग्ण स्थानिक आहेत, तर उर्वरित ६ रुग्णांना संसर्ग जिल्ह्याबाहेर झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्यामुळे स्थानिक स्तरावरील डेंग्यूचा प्रसार सध्या मर्यादित असल्याचे आरोग्य विभागाचे निरीक्षण आहे.

संगमेश्वर, लांजा, रत्नागिरी, गुहागर आणि दापोली या पाच तालुक्यांत डेंग्यूचे रुग्ण आढळले आहेत. तर मंडणगड, खेड, चिपळूण आणि राजापूर या चार तालुक्यांत आतापर्यंत एकही डेंग्यू रुग्ण आढळलेला नाही. त्यामुळे या तालुक्यांमध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजनांना चांगले यश मिळाल्याचे मानले जात आहे.

दरम्यान, पावसाळ्यात डेंग्यूसह मलेरिया, चिकुनगुनिया आणि इतर साथीच्या आजारांचा धोका वाढत असल्याने नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. घराच्या परिसरात पाणी साचू न देणे, पाण्याची भांडी झाकून ठेवणे, आठवड्यातून एकदा कुलर, टाक्या व इतर पाण्याची साठवण असलेली भांडी स्वच्छ करणे, पूर्ण बाह्यांचे कपडे परिधान करणे तसेच ताप, अंगदुखी किंवा इतर लक्षणे आढळल्यास तातडीने जवळच्या शासकीय आरोग्य केंद्रात तपासणी करून घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाने डेंग्यू प्रतिबंधासाठी विविध उपाययोजना सुरू ठेवल्या असून, नागरिकांच्या सहकार्यामुळे जिल्ह्यात डेंग्यूचा प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवण्यात यश येत असल्याचे डॉ. संतोष यादव यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *