रत्नागिरी : लग्नाचे आमिष दाखवून शरीरसंबंध ठेवणाऱ्या संशयिताला जामीन, हातखंबा गावात प्रवेशास न्यायालयाचा प्रतिबंध

banner 468x60

लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवून फसवणूक केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या हातखंबा येथील व्यावसायिक अमित मधुसूदन देसाईला रत्नागिरी जिल्हा व सत्र न्यायालयाने कठोर अटींसह जामीन मंजूर केला आहे. सत्र न्यायाधीश व्ही. वाय. जाधव यांनी दिलेल्या आदेशानुसार, आरोपपत्र दाखल होईपर्यंत आरोपीला हातखंबा गावाच्या हद्दीत प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे.

banner 728x90

या प्रकरणात संबंधित महिलेने आरोपीने विवाहाचे आश्वासन देत दीर्घकाळ शारीरिक संबंध ठेवून आपली फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवून अमित देसाई यांना १६ मे २०२५ रोजी अटक केली होती. त्यानंतर त्यांनी जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता.

जामीन अर्जावरील सुनावणीदरम्यान बचाव पक्षाने फिर्यादी आणि आरोपी हे दोघेही प्रौढ व विवाहित असल्याचा मुद्दा मांडला. दोघांमधील संबंध दहा वर्षांहून अधिक काळ परस्पर संमतीने सुरू होते, तसेच या कालावधीत फिर्यादीने कोणतीही तक्रार दाखल केली नव्हती, असा युक्तिवाद बचाव पक्षाकडून करण्यात आला.

दुसरीकडे, सरकारी पक्ष आणि फिर्यादीच्या वतीने आरोपीने विवाहाचे आश्वासन देत महिलेचा विश्वास संपादन केला, तिला घटस्फोटाची प्रक्रिया सुरू करण्यास प्रवृत्त केले; मात्र स्वतःच्या वैवाहिक स्थितीत कोणताही बदल करण्यासाठी आवश्यक पावले उचलली नाहीत, असा दावा करण्यात आला. तपास अद्याप सुरू असल्यामुळे आरोपीला जामीन देऊ नये, अशी मागणीही न्यायालयाकडे करण्यात आली.

दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने एफआयआरमध्ये विवाहाचे आश्वासन मोडल्याचा स्पष्ट उल्लेख नसल्याची नोंद केली. तसेच आरोपी बराच काळ न्यायालयीन कोठडीत असून पुढील कोठडीतील चौकशीची आवश्यकता नसल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. खटल्याचा अंतिम निकाल लागण्यापूर्वी आरोपीला अनावश्यकपणे कारागृहात ठेवणे हे शिक्षेसमान ठरू शकते, असेही न्यायालयाने आदेशात नमूद केले.

तथापि, तपासावर किंवा साक्षीदारांवर कोणताही परिणाम होऊ नये यासाठी न्यायालयाने कठोर अटी घातल्या आहेत. आरोपीने तपास अधिकाऱ्याला आपल्या निवासस्थानाची माहिती द्यावी, आठवड्यातून दोनदा संबंधित पोलीस ठाण्यात हजेरी लावावी, साक्षीदारांशी कोणताही संपर्क साधू नये आणि न्यायालयाच्या पूर्वपरवानगीशिवाय देशाबाहेर जाऊ नये, असे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच आरोपपत्र दाखल होईपर्यंत हातखंबा गावाच्या हद्दीत प्रवेश करण्यासही न्यायालयाने स्पष्टपणे मनाई केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *