दाभोळमध्ये गेल्या 12 तासांपासून वीजपुरवठा खंडित; नागरिक हैराण

banner 468x60

दाभोळ : पावसाळ्याच्या सुरुवातीलाच दाभोळ परिसरातील नागरिकांना वीजपुरवठ्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. गेल्या सुमारे १२ तासांपासून दाभोळमधील वीजपुरवठा खंडित असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

banner 728x90

आज सकाळी हर्णे आणि दापोली येथील मुख्य वीजवाहिनीत बिघाड निर्माण झाला होता. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ दुरुस्तीची कामे हाती घेत संबंधित बिघाड दूर केला. त्यामुळे दापोली आणि हर्णे परिसरातील वीजपुरवठा पूर्ववत झाला. मात्र दाभोळ परिसरातील वीजपुरवठा अद्याप सुरळीत होऊ शकला नसल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

या संदर्भात कोकण कट्टा न्यूजने दापोली महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, दापोली-वणौशी वीजवाहिनीवर तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याची माहिती देण्यात आली. सुरुवातीला नेमका फॉल्ट शोधण्यात अडचणी आल्याने दुरुस्तीच्या कामाला विलंब झाला. अखेर वणौशी परिसरात बिघाडाचे ठिकाण शोधण्यात यश आले असून दुरुस्तीचे काम पूर्णत्वाकडे असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

“फॉल्ट शोधण्यात वेळ गेला, मात्र आता बिघाडाचे ठिकाण सापडले असून काही वेळातच वीजपुरवठा पूर्ववत होईल,” असे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, दाभोळ परिसरात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत आहेत. प्रत्येक पावसाळ्यात अशा प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. महावितरणने कायमस्वरूपी उपाययोजना करून वीजपुरवठा अधिक सक्षम व विश्वासार्ह करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

पावसाळ्याच्या सुरुवातीलाच निर्माण झालेल्या या परिस्थितीमुळे घरगुती ग्राहक, व्यापारी तसेच विद्यार्थी वर्गाला विविध अडचणींचा सामना करावा लागत असून वीजपुरवठा लवकरात लवकर सुरळीत होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *