Breaking News
दाभोळ : महाडिक स्टॉप ते कोळथरे रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात, “कोकण कट्टा न्यूजच्या” वृत्ताची दखल चिपळूण : गडनदी-जामदा प्रकल्पातील देयक प्रकरणी कार्यकारी अभियंता प्रकाश जाधव निलंबित मंडणगड : रिक्षा-रुग्णवाहिका मिळेना मध्यरात्री महिलेची प्रकृती गंभीर, ‘112’ नंबरच्या कॉलवर मंडणगड पोलिसांची धावपोलिसांची तत्परता महिलेला ठरली जीवनदायी संगमेश्वर : तीन आमरण उपोषणे, 69 वर्षीय वृद्धाची आत्मदहनाच्या इशाऱ्याची पुनरावृत्ती; तरीही कुळाच्या जमिनीचा न्याय कागदावरच, देवरुख तहसीलदारांच्या आदेशाची अंमलबजावणी रखडली, निर्णय न झाल्यास उद्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा दापोली : मद्यधुंद अवस्थेत ईको कार चालवणाऱ्या चालकावर गुन्हा

खेड : कशेडी घाटात खैर लाकडांची अवैध वाहतूक उधळली, वनविभागाची धडक कारवाई, पाठलाग करून वाहन पकडले, 10 लाखांचा मुद्देमाल जप्त

banner 468x60

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटात वनविभागाने खैर लाकडांच्या अवैध वाहतुकीविरोधात मोठी कारवाई करत पिकअप वाहनासह सुमारे १० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तपासणी नाक्यावर वाहन न थांबवता चालकाने पळ काढल्यानंतर वनअधिकाऱ्यांनी पाठलाग करून वाहन पकडले. या प्रकरणी दोघांविरोधात वन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, अवैध लाकूड तस्करीच्या साखळीचा तपास सुरू करण्यात आला आहे.

banner 728x90

वनविभागाच्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारच्या सुमारास कशेडी घाटातील तपासणी नाक्यावर नियमित तपासणी सुरू होती. त्यावेळी एमएच ०८ एपी ६७९४ क्रमांकाचे पांढऱ्या रंगाचे पिकअप वाहन संशयास्पदरीत्या येताना दिसले. वाहनाची तपासणी करण्यासाठी ते थांबविण्याचा इशारा देण्यात आला. मात्र चालकाने वाहन न थांबवता भरधाव वेगाने पुढे नेले आणि घटनास्थळावरून पळ काढला.


यामुळे वाहनात काहीतरी बेकायदेशीर माल असल्याचा संशय वनअधिकाऱ्यांना आला. त्यानंतर वनविभागाच्या पथकाने तत्काळ वाहनाचा पाठलाग सुरू केला. काही अंतरावर वाहन अडवून ताब्यात घेण्यात आले. वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात खैराची लाकडे आढळून आली.

प्राथमिक चौकशीत ही लाकडे पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील वेल्हे परिसरातून रत्नागिरी जिल्ह्यात आणली जात असल्याचे निष्पन्न झाले. खैर हे आर्थिकदृष्ट्या मौल्यवान झाड मानले जाते. कातनिर्मिती, औषधी उपयोग तसेच विविध औद्योगिक कामांसाठी खैराच्या लाकडाला मोठी मागणी असल्याने त्याची अवैध तोड आणि वाहतूक होत असल्याचे वनविभागाच्या निदर्शनास येत असते.

या कारवाईत सुमारे १ लाख रुपये किमतीची खैराची लाकडे आणि ९ लाख रुपये किमतीचे पिकअप वाहन असा एकूण १० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्त केलेला माल आणि वाहन वनविभागाच्या ताब्यात घेऊन माणगाव येथील वनविभागाच्या डेपोमध्ये जमा करण्यात आले आहे.

या प्रकरणी शुभम मोरे (रा. घोडेगाव, ता. चिपळूण) आणि अजित मोरे (रा. जेजुरी, जि. पुणे) यांच्याविरोधात भारतीय वन कायद्यातील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांची चौकशी सुरू असून, अवैध लाकूड वाहतुकीमागील मुख्य सूत्रधार, लाकूड पुरवठादार आणि खरेदीदारांचा शोध घेतला जात आहे.

रोहा येथील उपवनसंरक्षक डॉ. शैलेंद्रकुमार जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक आशुतोष शेडगे, महाडचे वनक्षेत्रपाल आशिष पाटील तसेच वनपाल तेजस नरे, आदेश जाधव, संदीप उतेकर आणि सचिन मेने यांच्या पथकाने ही कारवाई केली. संबंधित अधिकाऱ्यांच्या तत्परतेमुळे अवैध वाहतुकीचा हा प्रकार उघडकीस आला.


दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यातील खैर लाकूड व कातनिर्मिती उद्योगांशी संबंधित काही अवैध व्यवहारांबाबत वनविभागाकडे यापूर्वीही माहिती प्राप्त झाली होती. त्यामुळे या कारवाईला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून, या प्रकरणातून आणखी मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता वनविभागातील सूत्रांनी व्यक्त केली आहे. वनसंपत्तीचे संरक्षण आणि अवैध वृक्षतोडीला आळा घालण्यासाठी अशा कारवाया भविष्यातही सुरू राहणार असल्याचे वनविभागाने स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *