रत्नागिरी : आंबा घाटात कोळशाने भरलेल्या 14 चाकी ट्रकला भीषण आग; पोलीस, अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला

banner 468x60

रत्नागिरी-नागपूर महामार्गावरील आंबा घाटात शनिवारी पहाटे घडलेल्या भीषण आगीच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. जयगडहून सातारा जिल्ह्यातील उंब्रजकडे ३१ टन कोळसा घेऊन जाणाऱ्या १४ चाकी ट्रकला अचानक आग लागल्याने काही काळ महामार्गावरील वाहतूक आणि परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, स्थानिक नागरिक, महामार्ग पोलीस, देवरुख पोलीस आणि अग्निशमन दलाच्या संयुक्त प्रयत्नांमुळे आग वेळीच आटोक्यात आणण्यात यश आले आणि संभाव्य मोठी दुर्घटना टळली.

banner 728x90

मिळालेल्या माहितीनुसार, शंभू चरण यादव (वय ४८, रा. हजारीबाग, झारखंड) हे एमएच-०९-एफएल-९०४७ क्रमांकाचा १४ चाकी ट्रक चालवत जयगड येथून उंब्रजकडे कोळशाची वाहतूक करत होते. शनिवारी पहाटे सुमारे चार वाजण्याच्या सुमारास आंबा घाटातील गणेश मंदिराच्या पाठीमागील भागात, रत्नागिरीच्या दिशेने सुमारे एक किलोमीटर अंतरावर ट्रकच्या इंजिन विभागातून धूर निघण्यास सुरुवात झाली. चालकाच्या लक्षात येताच त्यांनी ट्रक रस्त्याच्या कडेला थांबवला. मात्र, काही क्षणांतच धुराचे रूपांतर आगीत झाले आणि आगीने संपूर्ण केबिन तसेच ट्रकच्या पुढील भागाला वेढले.

ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात कोळसा असल्याने आग आणखी भडकण्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. पहाटेच्या अंधारात आगीच्या उंच ज्वाळा आणि धुराचे लोट दूरवरूनही दिसत होते. त्यामुळे महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांमध्येही घबराट पसरली. काही काळ वाहतूक सावधगिरीने सुरू ठेवण्यात आली.

प्राथमिक तपासात ट्रकच्या वायरिंगमध्ये ओव्हरहिटिंग होऊन शॉर्टसर्किट झाल्याने आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, आगीचे नेमके कारण तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.

घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस मदत केंद्र, हातखंबा येथील प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक दिपाली जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय पाटील, जीपीएसआय सावंत, पोलीस कर्मचारी वाकरे, लांबोरे, दाभाडे, संकपाळ, शिवलकर तसेच चालक कांबळे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. साखरपा पोलीस दूरक्षेत्राचे हेड कॉन्स्टेबल जाधव यांनीही मदतकार्यात सहभाग घेतला.


यावेळी आंबा गावातील ‘मृत्युंजय दूत’ म्हणून ओळखले जाणारे विजय पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनीही तत्काळ मदतीसाठी पुढाकार घेतला. देवरुख पोलीस आणि देवरुख नगरपंचायतीच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी दाखल होत युद्धपातळीवर आग विझविण्याचे काम सुरू केले. अनेक तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.

या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र ट्रकच्या केबिनसह वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आगीमुळे महामार्गावरील वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला होता. यंत्रणांच्या वेगवान प्रतिसादामुळे आणि स्थानिक नागरिकांच्या सहकार्यामुळे मोठी दुर्घटना टळल्याने सर्व स्तरांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, या प्रकरणाचा अधिक तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू असून आगीमागील नेमके कारण शोधले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *