रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ गणपतीपुळे समुद्रकिनारा येथे शनिवारी सकाळी घडलेल्या एका दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. छत्रपती संभाजीनगर येथून सहलीसाठी आलेल्या पर्यटकांच्या गटातील पाच जण समुद्रात बुडाल्याची घटना घडली असून, त्यांचा शोध घेण्यासाठी प्रशासन आणि जीवरक्षकांकडून युद्धपातळीवर शोधमोहीम राबविण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर येथून १९ जणांचा एक गट पर्यटनासाठी गणपतीपुळे येथे आला होता. सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी हे पर्यटक शनिवारी सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास समुद्रकिनाऱ्यावर गेले. यावेळी गटातील काही सदस्य समुद्रात उतरले. मात्र समुद्रातील पाण्याचा वेग, खोल भाग आणि लाटांच्या तीव्रतेचा योग्य अंदाज न आल्याने पाच जण अचानक समुद्राच्या आत ओढले गेले.
घटनेची माहिती मिळताच समुद्रकिनाऱ्यावरील स्थानिक ग्रामस्थ, व्यावसायिक, पर्यटक आणि तेथे तैनात असलेल्या जीवरक्षकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. बुडणाऱ्या पर्यटकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. समुद्रातील प्रबळ प्रवाहामुळे बचावकार्य अत्यंत कठीण बनल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
घटनेनंतर पोलीस, महसूल विभाग, स्थानिक प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. समुद्रात बेपत्ता झालेल्या पर्यटकांचा शोध घेण्यासाठी बोटींची मदत घेण्यात आली असून किनारपट्टीवरील विविध भागात शोधमोहीम राबविली जात आहे. समुद्रात सध्या पाण्याला जोरदार करंट असल्याने शोधकार्यात अडचणी निर्माण होत आहेत. तरीही जीवरक्षक आणि स्थानिक मच्छीमारांच्या सहकार्याने शोधकार्य अखंड सुरू ठेवण्यात आले आहे.
या दुर्घटनेमुळे गणपतीपुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून पर्यटकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पावसाळ्याच्या तोंडावर समुद्र अधिक खवळलेला असतो. अशा काळात अनेक ठिकाणी समुद्रात उतरण्यास बंदी अथवा इशारे दिले जातात. मात्र काही पर्यटकांकडून या सूचनांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचेही स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे.
दरम्यान, बेपत्ता झालेल्या पाच पर्यटकांची ओळख आणि त्यांच्याविषयीची अधिकृत माहिती प्रशासनाकडून अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. शोधमोहीम सुरू असून प्रशासनाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने पर्यटकांना समुद्रात उतरताना अत्यंत सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. जीवरक्षकांच्या सूचनांचे पालन करणे, धोकादायक भागात न जाणे आणि समुद्रातील प्रवाहाचा अंदाज न घेता खोल पाण्यात उतरणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
गणपतीपुळेसारख्या लोकप्रिय पर्यटनस्थळी घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात चिंता व्यक्त होत असून, बेपत्ता पर्यटकांचा सुखरूप शोध लागावा यासाठी सर्व स्तरांतून प्रार्थना व्यक्त केली जात आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













