रत्नागिरी : संभाषणाची ध्वनिमुद्रिका व्हायरल करण्याची धमकी, उमरेतील व्यक्तीकडून 17 लाखांची खंडणी, चौघांना अटक

banner 468x60

रत्नागिरी तालुक्यातील उमरे येथील ५२ वर्षीय व्यक्तीला संभाषणाची ध्वनिमुद्रिका नातेवाईक आणि मित्रपरिवाराला ऐकवून बदनामी करण्याची धमकी देत तब्बल १७ लाख ९ हजार ४९४ रुपयांची खंडणी उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलिसांनी एका महिलेसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. न्यायालयाने आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली असून या प्रकारामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

banner 728x90

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी रामचंद्र चिंतामणी केळकर (वय ५२, रा. उमरे, ता. रत्नागिरी) हे २२ जुलै २०२५ रोजी शहरातील एका खासगी रुग्णालयात आपल्या भावाची भेट घेण्यासाठी गेले होते. यावेळी रुग्णालय परिसरात त्यांना सुरैय्या हकीम ही महिला रडताना दिसली. केळकर यांनी तिच्याकडे चौकशी केली असता, मुलाच्या शस्त्रक्रियेसाठी पैसे नसल्याने ती अडचणीत असल्याचे सांगत मदतीची याचना केली.

मानवतावादी दृष्टिकोनातून केळकर यांनी तिला मदत करण्याचे आश्वासन दिले. त्यांनी आपला मोबाईल क्रमांक दिला. त्याच दिवशी दुपारी सुरैय्या हिने फोन करून आर्थिक मदतीची विनंती केल्यावर केळकर यांनी मारुती मंदिर परिसरात तिची भेट घेत १,५०० रुपये रोख दिले. त्यानंतर गुगल पेच्या माध्यमातून आणखी ५०० रुपये पाठवले.


मात्र, याच मदतीचा गैरफायदा घेत दुसऱ्याच दिवशी म्हणजे २३ जुलै रोजी केळकर यांच्या मोबाईलवर सुरैय्याच्या क्रमांकावरून एका अज्ञात पुरुषाचा फोन आला. “तुमचे आणि सुरैय्याचे संभाषण आम्ही रेकॉर्ड केले आहे. हे संभाषण तुमच्या नातेवाईकांना, मित्रांना आणि समाजमाध्यमांवर व्हायरल करू. बदनामी टाळायची असेल तर १० हजार रुपये द्या,” अशी धमकी देण्यात आली. अचानक आलेल्या या धमकीने घाबरलेल्या केळकर यांनी बदनामीच्या भीतीने संबंधित रक्कम तातडीने ऑनलाइन पाठवली.

यानंतर मात्र आरोपींच्या मागण्या वाढतच गेल्या. विविध कारणे सांगून तसेच संभाषण सार्वजनिक करण्याची धमकी देत आरोपींकडून सातत्याने पैशांची मागणी केली जात होती. प्रत्येक वेळी बदनामीची भीती दाखवून केळकर यांच्याकडून पैसे उकळण्यात आले. या सततच्या दबावामुळे आणि मानसिक छळामुळे ते प्रचंड तणावाखाली आले होते.

जुलै २०२५ ते मे २०२६ या सुमारे दहा महिन्यांच्या कालावधीत केळकर यांनी विविध व्यवहारांद्वारे आरोपींना एकूण १७ लाख ९ हजार ४९४ रुपये पाठविल्याचे तपासात समोर आले आहे. अखेर आरोपींच्या सततच्या धमक्या, पैशांची मागणी आणि मानसिक छळाला कंटाळून त्यांनी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

तक्रारीची गंभीर दखल घेत पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. प्राथमिक चौकशीत खंडणी उकळल्याचे निष्पन्न झाल्यानंतर सुरैय्या हकीम, हुसैन नाईक, अंजर हकीम आणि अरफान हकीम या चौघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३(५), ३०८(२) आणि ३०८(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली.

शुक्रवारी आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, आरोपींनी अशा प्रकारे इतरांनाही जाळ्यात ओढले आहे का, तसेच खंडणीची रक्कम नेमकी कशासाठी वापरण्यात आली याचा तपास रत्नागिरी शहर पोलीस करीत आहेत.

दरम्यान, समाजमाध्यमे आणि मोबाईल तंत्रज्ञानाचा गैरवापर करून ब्लॅकमेलिंग व खंडणी उकळण्याच्या घटना वाढत असल्याने नागरिकांनी अशा धमक्यांना बळी न पडता त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *