रत्नागिरी : पाणी काटकसरीने वापरा, रत्नागिरीकरांना जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

banner 468x60

रत्नागिरी जिल्ह्यात काही गावांमध्ये निर्माण झालेली पाणीटंचाईची परिस्थिती सध्या तात्पुरती असली, तरी पावसाचे आगमन लांबल्याने उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करणे अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी केले. नागरिकांनी विहिरी, विंधन विहिरी आणि नळाच्या पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.


banner 728x90

पाऊस लांबल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पाणीटंचाई नियोजनाबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्ह्यातील धरणांमधील उपलब्ध पाणीसाठा, विविध जलस्रोतांतील पाणी आणि आगामी काळातील आवश्यक पाणीपुरवठा याचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

बैठकीत संबंधित नगरपरिषद व नगरपंचायतींच्या मुख्याधिकाऱ्यांनी काही शहरांसाठी केवळ पुढील २५ ते ३० दिवस पुरेल इतकाच पिण्याच्या पाण्याचा साठा उपलब्ध असल्याची माहिती दिली.

यावेळी जिल्हाधिकारी जिंदल यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि ग्रामीण पाणीपुरवठा यंत्रणेच्या कामकाजाचा आढावा घेत टंचाईग्रस्त गावांतील पाणीपुरवठ्याबाबत आवश्यक माहिती तातडीने संकलित करण्याच्या सूचना दिल्या. तसेच आवश्यकतेनुसार मागणी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले.

बैठकीस अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, पाटबंधारे विभागाचे सहाय्यक अधीक्षक अभियंता अनिरुद्ध जोशी, कार्यकारी अभियंता विवेक सोनार, मुख्याधिकारी वैभव गारवे, फेडरेशन ऑफ रत्नागिरी चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष प्रशांत पटवर्धन, लोटे परशुराम इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. राज आंब्रे, संचालक शिरीष चौधरी, राजेश तिवारी आदी उपस्थित होते. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे तसेच विविध नगरपरिषद व नगरपंचायतींचे मुख्याधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *