चिपळूण : गोवळकोटमध्ये खाऱ्या पाण्याचा प्रश्न तीव्र, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि काँग्रेसची नगरपरिषद प्रशासनावर धडक,महिनाभरापासून मचुळ पाणीपुरवठ्याने नागरिक हैराण

banner 468x60

गोवळकोट येथील नागरिकांना गेल्या महिनाभरापासून नळाद्वारे खारे व मचुळ पाणीपुरवठा होत असल्याने संतापाची लाट उसळली आहे. पिण्याचे पाणी, स्वयंपाक, कपडे धुणे आणि इतर दैनंदिन गरजांसाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याची गुणवत्ता खालावल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि काँग्रेस नगरसेवकांनी नगरपरिषद प्रशासनावर धडक देत मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.

banner 728x90

शहरप्रमुख सचिन (भैय्या) कदम यांच्या नेतृत्वाखाली आणि गोवळकोट विभागप्रमुख संकेत शिंदे यांच्या पुढाकाराने हे आंदोलन करण्यात आले. यावेळी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह स्थानिक नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेल्या या प्रश्नाकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहून तातडीने तोडगा काढावा, अशी मागणी करण्यात आली.

गोवळकोट हा चिपळूण नगर परिषद हद्दीतील अत्यंत महत्त्वाचा प्रभाग मानला जातो. येथील पाणीटाकीतून शहरातील मोठ्या भागाला पाणीपुरवठा केला जातो. मात्र, दरवर्षी उन्हाळ्याच्या काळात विशेषतः एप्रिल, मे आणि जून महिन्यांत खाऱ्या पाण्याचा प्रश्न निर्माण होत असल्याची तक्रार नागरिकांकडून केली जाते. यंदाही त्याच समस्येची पुनरावृत्ती झाली असून गेल्या महिनाभरापासून नागरिकांना मचुळ आणि खारे पाणी मिळत आहे.

या पाण्याचा वापर केल्यानंतर पिण्यासाठी अयोग्य असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. अनेक कुटुंबांना पिण्याच्या पाण्यासाठी बाजारातून पाण्याचे कॅन विकत घ्यावे लागत आहेत. तर काही भागांतील महिलांना भर उन्हात विहिरी, बोअरवेल किंवा इतर स्रोतांमधून पाणी आणावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आर्थिक भारात वाढ झाली असून महिलांचे श्रमही वाढले आहेत.

स्थानिक नागरिकांच्या मते, खाऱ्या पाण्यामुळे भांडी, कपडे आणि घरगुती उपकरणांचे नुकसान होत आहे. तसेच त्वचारोग, पोटाचे विकार आणि इतर आरोग्यविषयक समस्या उद्भवण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींना याचा अधिक त्रास सहन करावा लागत असल्याचे सांगण्यात आले.

निवेदन स्वीकारताना प्रशासनाच्या वतीने मुख्याधिकारी संजय जाधव तसेच पाणीपुरवठा विभाग प्रमुख खाडे उपस्थित होते. यावेळी पदाधिकाऱ्यांनी नागरिकांच्या समस्या सविस्तरपणे मांडत पाणीपुरवठ्याची गुणवत्ता तपासावी, खाऱ्या पाण्याचे मूळ कारण शोधून कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात आणि नागरिकांना शुद्ध पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी केली.

दरम्यान, प्रशासनाने या प्रश्नाची दखल घेऊन आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती देण्यात आली. मात्र, तातडीने सुधारणा न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

गोवळकोटमधील नागरिकांसाठी हा प्रश्न केवळ पाणीपुरवठ्याचा नसून आरोग्य, दैनंदिन जीवन आणि मूलभूत सुविधांशी संबंधित आहे. त्यामुळे प्रशासनाने या समस्येवर दीर्घकालीन आणि प्रभावी उपाययोजना करून नागरिकांना दिलासा देण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *