दापोली-मंडणगड राज्य महामार्गाच्या चौपदरीकरण व काँक्रिटीकरणाचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू असले तरी अद्याप पूर्णत्वास गेलेले नाही. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच रस्त्याची दयनीय अवस्था समोर आल्याने वाहनचालक, प्रवासी तसेच स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
दापोली ते विसापूर फाटा या सुमारे १७ किलोमीटर लांबीच्या महामार्गाचे रुंदीकरण व काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. यामध्ये साडेपाच मीटर रुंदीचा जुना रस्ता सात मीटर रुंदीचा करण्यात येत असून धोकादायक वळणे कमी करण्यासाठी अनेक ठिकाणी डोंगर कापण्याचे काम करण्यात आले आहे. मात्र कामाची संथ गती आणि अपुऱ्या नियोजनामुळे रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस खराब होत चालली आहे.
अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी माती वाहून गेली असून रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. काही भागांत दगड, मातीचे ढिगारे आणि खोल खड्डे निर्माण झाल्याने वाहनचालकांना मोठ्या कसरतीने प्रवास करावा लागत आहे. विशेषतः दापोली, केळशी, आंजर्ले आणि मुरूड या पर्यटनस्थळांकडे जाणाऱ्या पर्यटकांसाठी हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा असल्याने पर्यटन व्यवसायावरही त्याचा विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.
दरम्यान, या मार्गावरील सुरू असलेल्या कामाचा परिणाम राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवेवरही होत आहे. पावसाळ्यात सुरक्षिततेच्या दृष्टीने बसचा वेग कमी ठेवावा लागणार असल्याने काही फेऱ्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होण्याची शक्यता आहे. तसेच ई-बस सेवा या मार्गावर चालविणे सध्याच्या परिस्थितीत अशक्य असल्याचे सांगितले जात आहे.
रस्त्याची परिस्थिती अधिकच खराब झाल्यास मुंबई आणि पुण्याकडे जाणाऱ्या एसटी बस व इतर वाहने खेडमार्गे मुंबई-गोवा महामार्गावर वळवावी लागू शकतात. त्यामुळे प्रवाशांचा वेळ आणि खर्च दोन्ही वाढण्याची शक्यता आहे.
या कामामुळे सोंडेघर, पिसई, वणौशी, पालगड, विसापूर, शिरखल आणि चिंचाळी परिसरातील नागरिकांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्यात लाल मातीच्या रस्त्याची दुरवस्था झाल्यास या गावांचा संपर्क तुटण्याची भीती व्यक्त केली जात आहे. वडवलीमार्गे पर्यायी रस्ता उपलब्ध असला तरी त्यामुळे दररोज ५ ते ६ किलोमीटरचा अतिरिक्त प्रवास करावा लागतो. दापोली-पालगड हे अंतर थेट १८ किलोमीटर असताना पर्यायी मार्गाने ते २३ ते २४ किलोमीटरपर्यंत वाढते. शिवाय हा रस्ता बहुतांश ठिकाणी एकेरी असल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.
“पावसाळ्यात रस्त्याची अवस्था आणखी बिकट झाल्यास ग्रामस्थांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होऊ शकते. त्यामुळे संबंधित यंत्रणा आणि ठेकेदाराने तातडीने कामाला गती देऊन सुरक्षित वाहतुकीची व्यवस्था करावी,” अशी मागणी पालगड येथील श्रीपाद जोशी यांनी केली आहे.
स्थानिक नागरिक, वाहनचालक आणि प्रवासी यांनीही पावसाळ्यापूर्वी किमान आवश्यक दुरुस्तीची कामे पूर्ण करून रस्ता वाहतुकीसाठी सुरक्षित करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













