दापोली : मुंबई-गोवा महामार्गावरील भीषण अपघातातील जखमी अनिल मरकड यांची मृत्यूशी झुंज अपयशी

banner 468x60

मुंबई-गोवा महामार्गावर पोलादपूर येथे ३० मे २०२६ रोजी झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेले दापोली येथील कृषी विद्यापीठाचे कर्मचारी अनिल मरकड यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर सोमवारी (९ जून) संपली. गेल्या दहा दिवसांपासून अतिदक्षता विभागात उपचार सुरू असतानाही त्यांची प्रकृती सुधारली नाही आणि अखेर त्यांनी अखेरचा श्वास घेतला. यामुळे आधीच पत्नी आणि मुलीला गमावलेल्या या कुटुंबावर आणखी एक दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यांचा मुलगा चिन्मय याच्या डोक्यावरून आई-वडिलांचे छत्र कायमचे हरपले आहे.

banner 728x90

अनिल मरकड हे दापोली येथील कोकण कृषी विद्यापीठात कार्यरत होते. उन्हाळी सुट्टी निमित्त ते पत्नी सुवर्णा, मुलगी अनुश्री आणि मुलगा चिन्मय यांच्यासह आपल्या मूळ गावी अहमदनगर येथे गेले होते. सुट्टी संपल्यानंतर ३० मे रोजी संपूर्ण कुटुंब आपल्या खासगी क्रेटा कारमधून दापोलीकडे परत येत होते. सर्व काही सुरळीत सुरू असताना सायंकाळी सुमारे चारच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावरील पोलादपूर परिसरात त्यांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, हॉटेल बालाजीजवळ रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या डंपरला त्यांच्या कारची जोरदार धडक बसली. धडकेची तीव्रता इतकी मोठी होती की कारचा समोरील भाग अक्षरशः चक्काचूर झाला. अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. स्थानिक नागरिक आणि मदतकार्य करणाऱ्यांनी तत्काळ जखमींना बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

या भीषण अपघातात अनिल मरकड यांच्या पत्नी सुवर्णा मरकड (पूर्वाश्रमीच्या गव्हाणे) आणि त्यांची लाडकी मुलगी अनुश्री यांचा जागीच मृत्यू झाला. सुवर्णा मरकड या स्टेट बँक ऑफ इंडिया येथे वरिष्ठ सहयोगी अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. आपल्या कर्तव्यदक्ष स्वभावामुळे आणि सौम्य वागणुकीमुळे त्या सहकारी व ग्राहकांमध्ये लोकप्रिय होत्या. त्यांच्या अकाली निधनामुळे बँकिंग क्षेत्रासह सामाजिक वर्तुळातही हळहळ व्यक्त करण्यात आली होती.

दरम्यान, अपघातात अनिल मरकड गंभीर जखमी झाले होते. त्यांच्या डोक्याला व शरीराच्या विविध भागांना गंभीर दुखापती झाल्याने त्यांना प्रथम स्थानिक रुग्णालयात उपचार देण्यात आले. त्यानंतर अधिक उपचारासाठी त्यांना पनवेल येथील विशेष रुग्णालयात हलविण्यात आले. गेल्या दहा दिवसांपासून ते अतिदक्षता विभागात जीवन-मरणाची झुंज देत होते. कुटुंबीय, मित्रपरिवार, सहकारी आणि परिचितांकडून त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केल्या जात होत्या. मात्र नियतीला काही वेगळेच मंजूर होते. अखेर ९ जून रोजी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

या अपघातात मुलगा चिन्मय याच्या हाताला दुखापत झाली होती. त्याच्यावर वेळेवर उपचार करण्यात आल्याने तो धोक्याबाहेर असून त्याची प्रकृती सुधारत आहे. मात्र अल्पावधीतच आई, बहीण आणि आता वडील अशा तिन्ही जवळच्या व्यक्तींना गमावल्याने त्याच्यावर दुःखाचा प्रचंड आघात झाला आहे. सध्या तो आपल्या आजी-आजोबांच्या देखरेखीखाली अहमदनगर येथे राहत आहे.

अनिल मरकड यांचे कुटुंब दापोली तालुक्यातील जालगाव येथील मंगलभूमी अपार्टमेंटमध्ये वास्तव्यास होते. मरकड कुटुंब हे परिसरात सर्वांशी जिव्हाळ्याचे संबंध ठेवणारे, सुसंस्कृत आणि मनमिळावू कुटुंब म्हणून ओळखले जात होते. त्यामुळे या दुर्घटनेची बातमी समजल्यानंतर संपूर्ण परिसर शोकमग्न झाला आहे. अपार्टमेंटमधील रहिवासी, कृषी विद्यापीठातील सहकारी, मित्रपरिवार तसेच स्थानिक नागरिक या घटनेमुळे स्तब्ध झाले असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

एका क्षणात आनंदी आणि सुखी संसार उद्ध्वस्त करणाऱ्या या दुर्घटनेने सर्वांनाच हेलावून टाकले आहे. विशेषतः लहान वयातच आई-वडिलांचे आणि बहिणीचे प्रेम गमावलेल्या चिन्मयच्या भवितव्याबाबत सर्वत्र चिंता व्यक्त केली जात आहे. मरकड कुटुंबावर ओढवलेल्या या दुःखद प्रसंगाबद्दल समाजातील विविध स्तरांतून शोकसंवेदना व्यक्त करण्यात येत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *