रत्नागिरी : दुचाकी अपघातात महिलेचा मृत्यू, पतीविरुद्ध गुन्हा दाखल

banner 468x60

रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुचाकी अपघातात गंभीर जखमी झालेल्या एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. या प्रकरणी बेदरकारपणे वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दुचाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

banner 728x90

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ मे २०२६ रोजी दुपारी सुमारे १.१५ वाजण्याच्या दरम्यान रत्नागिरी-कोळंबे मार्गावरील फणसोप हायस्कूलजवळील लक्ष्मी केशव सर्व्हिसिंग सेंटरसमोर हा अपघात घडला. संतोष सूर्यकांत लाखण (वय ५४, रा. न्यू मंडाळागाव, मानखुर्द, मुंबई) हे त्यांच्या ताब्यातील होंडा अ‍ॅक्टिव्हा (एमएच ०८ बीएम ००४७) या दुचाकीवरून पत्नी विद्या संतोष लाखण (वय ४८) यांना मागे बसवून त्रिमुखीदेवी, कोळंबे येथे ओटी भरण्यासाठी जात होते.

रत्नागिरीहून कोळंबेकडे जात असताना फणसोप परिसरातील गतिरोधकाजवळ वाहनाची गती आणि रस्त्याची परिस्थिती लक्षात न घेता चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने दुचाकीवरील नियंत्रण बिघडले. यामुळे मागे बसलेल्या विद्या लाखण या रस्त्यावर कोसळल्या. पडताना त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्या बेशुद्ध झाल्या.

अपघातानंतर स्थानिकांच्या मदतीने त्यांना तातडीने रिक्षामधून जिल्हा शासकीय रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) दाखल करण्यात आले. आयसीयूमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र गंभीर दुखापतीमुळे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

या घटनेनंतर पोलीस हवालदार प्रमोद तुकाराम कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात संतोष लाखण यांच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता (बीएनएस) २०२३ च्या कलम १०६(१), २८१, १२५(अ), १२५(ब) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून अपघाताचा अधिक तपास रत्नागिरी शहर पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *