संगमेश्वर : ऑनलाईन फसवणुकीत किराणा व्यापारी दाम्पत्याची २.१४ लाखांची रक्कम लंपास, संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

banner 468x60

संगमेश्वर तालुक्यातील बाजारपेठ परिसरातील एका किराणा व्यापारी व त्यांच्या पत्नीच्या बँक खात्यातून अज्ञात सायबर भामट्याने ऑनलाईन पद्धतीने तब्बल २ लाख १४ हजार १४८ रुपये परस्पर काढून घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली असून संगमेश्वर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

banner 728x90

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तौफिक जिकर मेमन (वय ३९, रा. नावडी, ता. संगमेश्वर) हे स्थानिक बाजारपेठेत किराणा व्यवसाय करतात. ३० मे रोजी सायंकाळी ६.२७ ते ७.१२ वाजण्याच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने त्यांच्या बँक खात्यात अनधिकृतरीत्या प्रवेश करून रक्कम काढून घेतली. या प्रकारात मेमन यांच्या बँक ऑफ इंडिया, संगमेश्वर शाखेतील खात्यातून ८९ हजार १४९ रुपये, तर त्यांच्या पत्नी फौजिया तौफिक मेमन यांच्या खात्यातून १ लाख २४ हजार ९९९ रुपये अशी एकूण २ लाख १४ हजार १४८ रुपयांची रक्कम ऑनलाईन व्यवहाराद्वारे लंपास करण्यात आली.

खात्यातील रक्कम कमी झाल्याचे लक्षात आल्यानंतर मेमन यांनी तातडीने बँकेशी संपर्क साधला. त्यानंतर फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला. याबाबत त्यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदविला असून आरोपीचा शोध सुरू केला आहे.

प्राथमिक तपासात ही फसवणूक सायबर गुन्हेगारांनी ऑनलाईन माध्यमातून केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. खात्यांमधून रक्कम कोणत्या माध्यमातून व कोणत्या खात्यांमध्ये वर्ग करण्यात आली, याचा तपास पोलीस करत आहेत. बँक व्यवहारांचे तांत्रिक तपशील, मोबाईल क्रमांक, आयपी अ‍ॅड्रेस तसेच व्यवहारांची माहिती तपासली जात आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. दरम्यान, अशा प्रकारच्या वाढत्या सायबर फसवणुकीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी बँक खात्याची माहिती, एटीएम कार्ड क्रमांक, सीव्हीव्ही, ओटीपी, युजर आयडी व पासवर्ड कोणालाही देऊ नयेत, तसेच संशयास्पद फोन कॉल, मेसेज किंवा लिंकवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

संगमेश्वर तालुक्यात घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून सायबर सुरक्षेबाबत अधिक जागरूक राहण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *