महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ अंतर्गत राज्याच्या सागरी क्षेत्रात आज, १ जूनपासून पावसाळी मासेमारी बंदी लागू झाली आहे. ही बंदी ३१ जुलैपर्यंत कायम राहणार असून या कालावधीत यंत्रचलित व यांत्रिक मासेमारी नौकांना समुद्रात मासेमारी करण्यास पूर्णपणे मनाई करण्यात आली आहे.
मत्स्यसंपत्तीचे संवर्धन, मासळीच्या प्रजननास चालना देणे आणि सागरी पर्यावरणाचा समतोल राखणे या उद्देशाने दरवर्षी पावसाळ्यात ही बंदी लागू केली जाते. या काळात समुद्रात मासेमारी करणाऱ्या यांत्रिक नौकांवर कठोर कारवाईचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
प्रशासनाच्या आदेशानुसार, पावसाळी मासेमारी बंदी केवळ यंत्रचलित आणि यांत्रिक नौकांसाठी लागू राहणार आहे. पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या बिगर-यंत्रचलित नौकांना या बंदीतून सूट देण्यात आली आहे. समुद्रात गेलेल्या सर्व यांत्रिक नौकांनी १ जूनपूर्वी संबंधित मासेमारी बंदरांमध्ये परतणे बंधनकारक करण्यात आले होते. तसेच ३१ जुलैपर्यंत किंवा त्यापूर्वी कोणत्याही यांत्रिक नौकेला समुद्रात मासेमारीसाठी जाण्याची परवानगी नसणार आहे.
राज्याच्या सागरी जलधी क्षेत्राबाहेर म्हणजेच १२ सागरी मैलांपुढे खोल समुद्रात जाणाऱ्या नौकांसाठी केंद्र शासनाच्या धोरणानुसार आणि लागू असलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार कार्यवाही करण्यात येणार आहे.
दरम्यान, शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करून १२ सागरी मैलांच्या आत मासेमारी करणाऱ्या नौकांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम २०२१ मधील कलम १४ आणि १७ नुसार नियमभंग करणाऱ्या नौका, त्यावरील उपकरणे, मासेमारीचे साहित्य तसेच पकडलेली मासळी जप्त करण्यात येणार आहे. याशिवाय संबंधित दोषींवर कायद्यानुसार दंडात्मक कारवाईही केली जाणार आहे.
बंदीच्या कालावधीत बेकायदेशीरपणे मासेमारी करताना कोणताही अपघात घडल्यास संबंधित नौकामालक किंवा मच्छीमारांना शासनाकडून कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत अथवा नुकसानभरपाई दिली जाणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
मत्स्य व्यवसायाशी संबंधित सर्व नौकामालक, मच्छीमार आणि सहकारी संस्थांनी शासनाच्या आदेशांचे काटेकोरपणे पालन करावे, अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा मत्स्यव्यवसाय विभागाकडून देण्यात आला आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













