दाभोळ : वणौशी येथे अज्ञात व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला

banner 468x60

दाभोळ परिसरातील वणौशी दहातोंडी वाडी येथे आज सकाळी एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. हा मृतदेह वणौशी येथील विनोद दवंडे यांच्या मालकीच्या बागेत विहिरीजवळ सापडला असून, प्राथमिक पाहणीत तो गेल्या चार ते पाच दिवसांपासून त्या ठिकाणी पडून असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. स्थानिकांना बागेच्या परिसरातून दुर्गंधी येत असल्याची जाणीव झाल्यानंतर त्यांनी परिसराची पाहणी केली.

banner 728x90

त्यावेळी एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती तत्काळ संजय बारे यांनी दाभोळ पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. मृतदेहाची अवस्था अत्यंत कुजलेली असल्याने ओळख पटविण्यात मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत. विशेषतः चेहरा अळ्यांनी विद्रूप झाल्याने मृत व्यक्तीची ओळख निश्चित करणे कठीण झाले आहे.

मृत व्यक्तीचे वय अंदाजे ३५ ते ४०वर्षे असावे, असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
सद्यस्थितीत मृत व्यक्तीची ओळख पटलेली नसून तो स्थानिक रहिवासी नसल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे हा व्यक्ती नेमका कोण, तो या परिसरात कसा आला आणि त्याच्या मृत्यूमागील कारण काय, याबाबत विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे. मात्र, पोलिसांनी कोणताही निष्कर्ष काढण्यापूर्वी तपास पूर्ण होणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले आहे.


दाभोळ पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे. तसेच मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी परिसरातील नागरिक, ग्रामस्थ तसेच आसपासच्या गावांतील लोकांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे. या घटनेमुळे वणौशी परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गोरे यांच्याकडून सर्व अंगांनी तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *