चिपळूणमध्ये अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलिसांकडून ओळख पटविण्याचे प्रयत्न

banner 468x60

चिपळूण शहरातील पेठमाप येथील शिवनेरी चौक परिसरात एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

banner 728x90

मिळालेल्या माहितीनुसार, पेठमाप येथील रहिवासी प्रेमनाथ पांडुरंग देवळेकर (वय ७६) हे रविवार दिनांक २५ मे रोजी रात्री सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास नेहमीप्रमाणे नैसर्गिक विधीसाठी घराबाहेर गेले होते. त्यावेळी त्यांच्या घराजवळील सार्वजनिक शौचालयाच्या पाण्याच्या टाकीच्या स्टँडजवळ एक अनोळखी पुरुष जमिनीवर झोपलेल्या अवस्थेत दिसून आला.

सुरुवातीला संबंधित व्यक्ती झोपलेली असावी असा अंदाज देवळेकर यांनी व्यक्त केला. मात्र बराच वेळ कोणतीही हालचाल दिसून न आल्याने त्यांनी जवळ जाऊन त्या इसमाला उठविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी संबंधित व्यक्तीच्या शरीरात कोणतीही हालचाल नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. शरीर पूर्णपणे ताठर व थंड पडलेले होते तसेच श्वासोच्छवासही बंद झाल्याने त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.

घटनेची माहिती मिळताच चिपळूण पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृत व्यक्तीचे वय अंदाजे ५० ते ५५ वर्षे असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र त्याच्याकडे कोणतीही ओळखपत्रे अथवा माहिती न सापडल्याने अद्याप त्याची ओळख पटू शकलेली नाही.

पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी पाठवला असून मृत्यूचे नेमके कारण अहवालानंतर स्पष्ट होणार आहे. दरम्यान, या घटनेची चिपळूण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून परिसरातील नागरिकांकडूनही संबंधित व्यक्तीबाबत माहिती मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *