राजापूर : नग्न फोटो व्हायरल करण्याची धमकी, डॉक्टरकडून खंडणी उकळण्याचा प्रयत्न, तरुणावर गुन्हा दाखल

banner 468x60

सोशल मीडियावरील ओळखीचा गैरफायदा घेत एका डॉक्टरला त्याचे खासगी फोटो व्हायरल करण्याची धमकी देत लाखो रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार राजापूर तालुक्यात उघडकीस आला आहे. या प्रकरणी लांजा तालुक्यातील साडवली येथील एका ३० वर्षीय तरुणाविरुद्ध राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

banner 728x90

मिळालेल्या माहितीनुसार, वडदहसोळ म्हादये येथील रहिवासी असलेले अक्षय गिरीधर म्हादये (वय ३१) हे व्यवसायाने डॉक्टर आहेत. सन २०२५ मध्ये त्यांच्या ‘Dr_Akshay_mhadye’ या इन्स्टाग्राम खात्यावरून नेहा बिराडी हिच्या ‘neha_biradi_03’ या इन्स्टाग्राम आयडीद्वारे संपर्क झाला होता. सोशल मीडियावरून सुरू झालेल्या या ओळखीतून दोघांमध्ये संवाद वाढला. त्यानंतर संबंधित महिलेच्या सांगण्यावरून डॉक्टरांनी स्वतःचे काही खासगी व नग्न फोटो तिला शेअर केले होते.

दरम्यान, २२ मे २०२६ रोजी सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास डॉक्टरांना अचानक एका व्हॉट्सॲप क्रमांकावरून संदेश प्राप्त झाले. त्या संदेशांमध्ये त्यांचे खासगी फोटो पाठवण्यात आले होते. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली. तसेच फोटो हटवण्यासाठी आणि इतरांना न पाठवण्यासाठी आरोपीने तब्बल २ लाख २५ हजार रुपयांची मागणी केली.

या प्रकरणात सिद्धेश जयवंत आंबरे (वय ३०, रा. साडवली, ता. लांजा) याचे नाव समोर आले आहे. आरोपीने डॉक्टरांना सतत धमकीचे संदेश पाठवत मानसिक दबाव निर्माण केला. आपली बदनामी होईल या भीतीने डॉक्टरांनी आरोपीच्या खात्यावर गुगल पे द्वारे २५ हजार रुपये ऑनलाइन ट्रान्सफर केले.

मात्र पैसे दिल्यानंतरही धमक्या आणि पैशांची मागणी थांबत नसल्याने संबंधित डॉक्टर मानसिक तणावाखाली गेले. अखेर त्यांनी धाडस करून २७ मे २०२६ रोजी रात्री ११.२१ वाजता राजापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

तक्रारीनुसार पोलिसांनी आरोपी सिद्धेश जयवंत आंबरे याच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक १५१/२०२६ दाखल केला आहे. त्याच्यावर भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०८(२) अंतर्गत खंडणीचा, कलम ३५१(२) अंतर्गत गुन्हेगारी धमकीचा तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६(ई) अंतर्गत खासगी माहितीचा गैरवापर केल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

या घटनेमुळे सोशल मीडियावरील ओळखी आणि खासगी माहिती शेअर करताना अधिक सतर्क राहण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे. राजापूर पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून आरोपीच्या हालचालींबाबत माहिती गोळा करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *