चिपळूण : गाडी बाजूला घ्या” म्हणताच वाद, चिपळूणात व्यक्तीच्या डोक्यात दगड घालून मारहाण, पार्किंगच्या कारणावरून हिंसक हल्ला, बाळू चव्हाण आणि सुयोग चव्हाण दोघांविरोधात गुन्हा दाखल

banner 468x60

चिपळूणमध्ये दुचाकी लावण्यासाठी जागा मागितल्याच्या किरकोळ कारणावरून सुरू झालेला वाद काही क्षणांतच हिंसक वळणावर गेला आणि एका ५७ वर्षीय व्यक्तीवर दगडाने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना चिपळूण शहरातील पिंपळी नाका येथे घडली. या प्रकरणी दोन जणांविरोधात चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

banner 728x90

ही घटना रविवारी, २४ मे रोजी रात्री साडेसातच्या सुमारास घडली. जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव सतीश हनुमंत नलावडे (वय ५७, रा. पिंपळी खुर्द, मारुती नगर, पाष्टेवाडी, ता. चिपळूण) असे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सतीश नलावडे हे रविवारी रात्री आपल्या मुलांसाठी खाऊ घेण्यासाठी पिंपळी नाका परिसरात गेले होते. त्या वेळी त्यांनी आपली दुचाकी उभी करण्यासाठी जागा शोधत असताना तेथे उभ्या असलेल्या बाळू चव्हाण यांना, “मला गाडी लावायची आहे, थोडे बाजूला व्हा,” असे सांगितले. मात्र, या साध्या विनंतीचाही आरोपीला राग आला.

“तुला गाडी लावायला दुसरीकडे जागा नाही का?” असे म्हणत आरोपी बाळू चव्हाण याने नलावडे यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. वातावरण तापले असतानाच नलावडे हे आपली दुचाकी बाजूला घेत होते. त्यावेळी त्यांच्या गाडीचा आरोपीला किरकोळ धक्का लागला. या किरकोळ धक्क्यानंतर आरोपी अधिकच संतप्त झाला.

तक्रारीनुसार, बाळू चव्हाण याने नलावडे यांच्या जवळ जाऊन त्यांच्या कानशिलात मारली. त्याचवेळी तेथे उपस्थित असलेल्या सुयोग चव्हाण याने नलावडे यांचे दोन्ही हात पाठीमागून घट्ट पकडून ठेवले. त्यामुळे नलावडे यांना स्वतःचा बचाव करता आला नाही.

यानंतर बाळू चव्हाण याने रस्त्याच्या कडेला पडलेला मोठा दगड उचलून थेट नलावडे यांच्या डोक्यात मारल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात नलावडे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून ते जखमी झाले आहेत. अचानक झालेल्या या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

घटनेनंतर सतीश नलावडे यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी या तक्रारीवरून आरोपी बाळू चव्हाण आणि सुयोग चव्हाण (दोघेही रा. पिंपळी खुर्द, ता. चिपळूण) यांच्याविरोधात गुन्हा रजिस्टर क्रमांक १४५/२०२६ नुसार भारतीय न्यायसंहिता २०२३ मधील कलम ११८(१), ११५(२), ३५२ आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणाचा अधिक तपास चिपळूण पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *