दापोली : कोडजाई नदीपात्रात तरुणाची आत्महत्या

Screenshot

banner 468x60

दापोली तालुक्यातील खरवते येथील २६ वर्षीय तरुणाने कुंभवे येथील कोडजाई नदीच्या पात्रात झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना सोमवारी उघडकीस आली. कांचन गणेश फराटे (वय २६, रा. खरवते, ता. दापोली, जि. रत्नागिरी) असे मृत तरुणाचे नाव असून, या घटनेमुळे खरवते परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


banner 728x90

पोलीसांकडून

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवार २५ मे रोजी सकाळी पावणेअकरा वाजण्याच्या सुमारास मौजे कुंभवे येथील कोडजाई नदीच्या पात्रातील ‘फणसाचा डोह’ परिसरात ही घटना घडली. नदीकाठी असलेल्या फणसाच्या झाडामध्ये वडाच्या झाडाची पारंबी गुंतलेली होती. कांचन फराटे याने याच पारंबीच्या साहाय्याने गळफास घेत आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

दरम्यान, दुपारी पावणेचार वाजण्याच्या सुमारास स्थानिक नागरिकांना नदीकाठच्या झाडाला एक मृतदेह लटकलेल्या अवस्थेत दिसून आला. यानंतर तातडीने ग्रामस्थांनी पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी धाव घेतल्यानंतर रुग्णवाहिकेद्वारे कांचन फराटे याला दापोली उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्याला उपचारापूर्वीच मृत घोषित केले.

या प्रकरणी मयताचे चुलते महादेव देवजी फराटे (रा. खरवते, ता. दापोली) यांनी दापोली पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी बी.एन.एस.एस. कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद (अकस्मात मृत्यू रजि. क्र. ४६/२०२६) केली असून घटनेचा पुढील तपास सुरू आहे.


घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस विविध अंगांनी तपास करत आहेत. अचानक घडलेल्या या घटनेमुळे फराटे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *