चिपळूण : अत्याधुनिक ‘सीबीसीटी सेंटर’ची सुरुवात; डॉ. सानिका वाजे यांचा अभिनव उपक्रम

banner 468x60

चिपळूण : कोकणातील दंतवैद्यकीय आणि मुखरोग निदान क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाची मोठी भर पडली असून, डॉ. सानिका राजेश वाजे यांनी चिपळूण येथे अत्याधुनिक ‘डायग्नोटेड सीबीसीटी सेंटर’ सुरू केले आहे. मुख, जबडा आणि चेहऱ्याशी संबंधित गंभीर आजारांचे अचूक आणि प्राथमिक टप्प्यात निदान करणारी ही सुविधा आता चिपळूणमध्ये उपलब्ध झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यासह संपूर्ण कोकणासाठी ही सेवा अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

banner 728x90

रत्नागिरी ते पनवेल दरम्यान ओरल अँड मॅक्सोफेशियल रेडिओलॉजिस्ट म्हणून कार्यरत असणाऱ्या डॉ. सानिका वाजे या एकमेव तज्ज्ञ ठरल्या असून, कोकणातील पहिल्या महिला तज्ज्ञ म्हणून त्यांनी नवी ओळख निर्माण केली आहे.

चिपळूण शहरातील विजय मेडिकलच्या वर सुरू करण्यात आलेल्या या सेंटरचा उद्घाटन सोहळा माजी आमदार रमेशभाई कदम यांच्या हस्ते पार पडला. यावेळी ज्येष्ठ दंतवैद्य डॉ. जयंत महेंदळे, सामाजिक कार्यकर्ते विजयशेठ माटे, राष्ट्रवादीचे नेते जयंद्रथ खताते, राजेश वाजे, संजय वाजे, डॉ. अभिजीत सावंत, डॉ. मंगेश वाजे, डॉ. मीनल थत्ते आदी मान्यवर उपस्थित होते. आमदार शेखर निकम यांनीही भेट देत शुभेच्छा दिल्या.

मुंबई-पुण्यासारख्या महानगरांमध्ये उपलब्ध असलेली थ्री-डी एक्स-रे स्कॅन सुविधा आता चिपळूणमध्ये उपलब्ध झाली आहे. सामान्य एक्स-रेमध्ये केवळ दोन-आयामी चित्र मिळते; मात्र सीबीसीटी मशीनद्वारे दात, जबडा आणि संपूर्ण चेहऱ्याचे थ्री-डी स्कॅनिंग करता येते. यामुळे अंतर्गत रचना स्पष्ट दिसून अचूक निदान शक्य होते. विशेष म्हणजे अत्यल्प रेडिएशनमध्ये ही तपासणी केली जाते.

दंत इम्प्लांटचे नियोजन, रूट कॅनल उपचार, अक्कलदाढीची तपासणी, सांध्यांची झीज, चेहऱ्यावरील फ्रॅक्चर, सायनस तसेच मुखाच्या कर्करोगाचा प्रसार कितपत झाला आहे, याची खात्रीशीर माहिती या स्कॅनमधून मिळते.

चिपळूणच्या गद्रे हायस्कूलमधून प्राथमिक शिक्षण आणि डीबीजे महाविद्यालयातून बारावी पूर्ण केल्यानंतर डॉ. सानिका यांनी कोल्हापूर येथील तात्यासाहेब कोरे डेंटल कॉलेजमधून बीडीएस पदवी घेतली. त्यानंतर पुण्यातील सिंहगड डेंटल कॉलेजमधून त्यांनी डेंटल सर्जरीमध्ये मास्टर्स केले. २०२५ मध्ये ‘ओरल मेडिसिन अँड रेडिओलॉजी’ विषयात त्यांनी मास्टर पदवी पूर्ण केली असून मुंबईतील सीबीसीटी सेंटरमध्ये व्यावसायिक अनुभव घेतला आहे. तसेच त्यांनी टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये प्रशिक्षणार्थी म्हणूनही काम केले आहे.

लखनऊ येथे झालेल्या परिषदेत ‘नॉन-थर्मल प्लाझ्माद्वारे कर्करोग उपचार’ या त्यांच्या शोधनिबंधाला विशेष पुरस्कारही प्राप्त झाला होता.

गुटखा, तंबाखूमुळे होणारे आजार, तोंडातील जखमा व गाठी यांचे सुरुवातीच्या टप्प्यात निदान झाल्यास रुग्णांचा जीव वाचू शकतो. हे अत्याधुनिक निदान तंत्रज्ञान आता कोकणात उपलब्ध झाल्याने ग्रामीण भागातील रुग्णांची मोठी सोय झाली आहे.

डॉ. सानिका यांचे वडील राजेश वाजे हे चिपळूणमधील नामांकित बांधकाम व्यावसायिक व क्रेडाई संस्थेचे पदाधिकारी आहेत, तर डॉ. मंगेश वाजे हे सीजीपीएचे माजी अध्यक्ष आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील आधुनिक आणि आव्हानात्मक शाखेत पाऊल टाकत डॉ. सानिका वाजे यांनी कोकणासाठी एक महत्त्वाची आरोग्यसेवा उपलब्ध करून दिली असून, त्यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *