दापोली : वीजेचा शॉक लागून वायरमनचा दुर्दैवी मृत्यू, काम करताना तरुणाचा जागीच मृत्यू

banner 468x60

दापोली तालुका तालुक्यातील मुरुड परिसरातील गव्हे ब्राह्मणवाडी येथे राहणारे संकेत हरिश्चंद्र पवार (वय ३४) यांचा वीजेच्या पोलवर काम करत असताना विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी (२२ मे) सायंकाळी घडली. या अचानक घडलेल्या दुर्घटनेमुळे संपूर्ण गव्हे गावावर शोककळा पसरली असून पवार कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

banner 728x90


मिळालेल्या माहितीनुसार, संकेत पवार हे गेली अनेक वर्षे वीज वितरण कंपनीच्या खाजगी ठेकेदाराकडे वायरमन म्हणून काम करत होते. मेहनती, शांत आणि जबाबदार स्वभावामुळे ते सहकाऱ्यांमध्ये तसेच गावातही परिचित होते. शुक्रवारी सकाळी ते नेहमीप्रमाणे आपल्या सहकाऱ्यांसोबत मुरुड परिसरात वीज दुरुस्ती आणि देखभालीच्या कामासाठी गेले होते.


दिवसभर विविध ठिकाणी काम सुरू असताना सायंकाळच्या सुमारास संकेत पवार हे वीजेच्या पोलवर चढून तांत्रिक काम करत होते. त्याचवेळी अचानक त्यांना विजेचा जोरदार शॉक लागला. जोरदार धक्क्यामुळे ते गंभीर जखमी झाले. घटनेनंतर सहकाऱ्यांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. त्यांना खाली उतरवून उपचारासाठी हालचाल सुरू करण्यात आली. मात्र, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.
ही घटना समजताच परिसरात मोठी खळबळ उडाली. गावकऱ्यांनी घटनास्थळी गर्दी केली होती.

अत्यंत कष्टाळू आणि कुटुंबवत्सल म्हणून ओळख असलेल्या संकेत यांच्या निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुले तसेच इतर कुटुंबीय असा परिवार आहे. घरातील कर्ता व्यक्ती अचानक गेल्याने कुटुंबीयांवर मोठा आघात झाला आहे.


दरम्यान, या घटनेनंतर वीज कामगारांच्या सुरक्षिततेचा मुद्दाही पुन्हा ऐरणीवर आला आहे. वीज दुरुस्तीची कामे करताना आवश्यक सुरक्षा साधने, खबरदारी आणि योग्य यंत्रणा उपलब्ध करून देण्याची मागणी स्थानिकांकडून व्यक्त होत आहे.


संकेत पवार यांच्या निधनाबद्दल परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत असून अनेकांनी सोशल मीडियावर श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *