TWJ विरोधातआणखी एक गुन्हा दाखल, TWJकडून 64 लाखांचा गंडा; रत्नागिरीतील दांपत्यासह संचालकांवर कोल्हापुरात गुन्हा

banner 468x60

अल्पावधीत भरघोस आर्थिक परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवत गुंतवणूकदारांची तब्बल ६४ लाख ९८ हजार ८९७ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी ‘टीजेडब्ल्यू लर्निंग सोल्युशन’ या कंपनीच्या सहा संचालकांविरुद्ध शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात रत्नागिरीतील एका दांपत्यासह अन्य संचालकांचा समावेश असून, मुख्य सूत्रधार समीर सुभाष नार्वेकर हा सध्या नागपूर पोलिसांच्या ताब्यात असल्याची माहिती समोर आली आहे.

banner 728x90

याबाबत वीणा नितीन लकडे (रा. पुईखडी, कोल्हापूर) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या प्रकरणात वीसपेक्षा अधिक गुंतवणूकदारांची रक्कम अडकली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

कावळा नाका येथे सुरू केले कार्यालय

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित समीर नार्वेकर याने २०२३ साली कोल्हापूरातील कावळा नाका परिसरात ‘टीजेडब्ल्यू लर्निंग सोल्युशन’ या नावाने कार्यालय सुरू केले होते. कंपनीच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी विविध जाहिराती, प्रेझेंटेशन, सेमिनार आणि बैठका आयोजित केल्या जात होत्या.

गुंतवणूक केल्यास दरमहा ३ ते ५ टक्के परतावा मिळेल तसेच वर्षभरात संपूर्ण मूळ रक्कम परत केली जाईल, असे आश्वासन देण्यात येत होते. या योजनांना अनेकांनी प्रतिसाद दिला.

सुरुवातीला दिला परतावा, नंतर फसवणूक

विश्वास संपादन करण्यासाठी सुरुवातीच्या काळात काही गुंतवणूकदारांना नियमित परतावा देण्यात आला. त्यामुळे अनेकांनी आपली बचत तसेच नातेवाईक आणि परिचितांनाही या योजनेत सहभागी करून घेतले.

फिर्यादी वीणा लकडे यांनीही कंपनीवर विश्वास ठेवून आपल्या नातेवाईकांना योजनेबाबत माहिती दिली होती. त्यानंतर त्यांच्या परिचयातील अनेकांनी मोठ्या प्रमाणात रक्कम गुंतवली.

मात्र, २१ मार्च २०२६ पासून गुंतवणूकदारांना परतावा मिळणे अचानक बंद झाले. कंपनीच्या कार्यालयाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळेनासा झाला. त्यानंतर कंपनीचे संचालक आणि संबंधित व्यक्ती संपर्काबाहेर गेल्याचे समोर आले.

नऊ जणांची सुमारे ६५ लाखांची फसवणूक

फिर्यादीनुसार, एकट्या नऊ गुंतवणूकदारांकडून ६४ लाख ९८ हजार ८९७ रुपये जमा करण्यात आले होते. परंतु, ही रक्कम परत न करता गुंतवणूकदारांची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणात रत्नागिरीतील एका दांपत्यासह कंपनीच्या इतर संचालकांचाही सहभाग असल्याचे तपासात पुढे येत आहे.

समीर नावेरकरवर यापूर्वीही गुन्हे

मुख्य संशयित समीर सुभाष नार्वेकर याच्यावर राज्यातील विविध भागांत यापूर्वीही आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. कोल्हापूर पोलिसांकडूनही पुढील चौकशीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

शाहूपुरी पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करत असून, आणखी किती गुंतवणूकदारांची फसवणूक झाली आहे याचा शोध घेतला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *