Breaking News
दापोली : बंद घरात वृद्धेचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह संगमेश्वर : आंबा घाटात एसटी बस आणि एर्टिका कारची समोरासमोर धडक; पाच जण जखमी दापोली : दादा इदाते यांच्या जीवनकार्यावर आधारित पुस्तकाचे मुंबई लोकभवन येथे राज्यपाल जिष्णू देव शर्मा यांच्या हस्ते प्रकाशन, पद्मश्री दादा इदाते यांच्या जीवनकार्याचा प्रेरणादायी प्रवास इंग्रजीतून वाचकांसमोर राजापूर-संगमेश्वरात हॉटेल रजिस्टर चोरी प्रकरण : संशयितांची गाडी जप्त, सात मोबाईल आणि नऊ रजिस्टर पोलिसांच्या ताब्यात, ‘कर्नाटक गँग’चा पर्दाफाश लांजा : जुन्या वादाचा राग मनात धरून तरुणीवर हल्ला, घरात घुसून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण

संगमेश्वर : आंबा घाटात एसटी बस आणि एर्टिका कारची समोरासमोर धडक; पाच जण जखमी

banner 468x60

संगमेश्वर तालुका येथील रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावर आंबा घाट परिसरात गुरुवारी सकाळी भीषण अपघात घडला. आंबा घाटातील दख्खन बस थांबा जवळ एसटी बस आणि एर्टिका कार यांच्यात समोरासमोर जोरदार धडक होऊन पाच जण जखमी झाले. या अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. ही घटना सकाळी सुमारे ९.४० वाजण्याच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रल्हाद भिकाजी शिंदे (वय ५०, रा. भडकंबा) हे आपल्या ताब्यातील एसटी बस (एमएच १४ बीटी २७५३) खडीकोळवण ते साखरपा या मार्गावर घेऊन जात होते. सकाळच्या वेळेमुळे बसमध्ये प्रवाशांची वर्दळ होती. दरम्यान, बस आंबा घाटातील दख्खन बस थांब्याजवळ पोहोचली असता समोरून भरधाव वेगाने येणारी एर्टिका कार (एमएच ११ डीझेड ०३२९) आणि एसटी बस यांच्यात भीषण समोरासमोर धडक झाली.

banner 728x90

एर्टिका चालक संतोष शिवाजी पवार (वय ५०, रा. रामनगर, सातारा) हे रत्नागिरीहून साताऱ्याकडे जात होते. घाटातील वळणावर दोन्ही वाहनांमधील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. धडक इतकी जोरदार होती की, दोन्ही वाहनांच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले. अपघातानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला.

या अपघातात एसटी चालक प्रल्हाद शिंदे, एसटी प्रवासी संजय तुकाराम शितप (वय ५८, रा. खडीकोळवण), एर्टिका चालक संतोष पवार, शंभुराज शिवाजी पवार (वय १३, रा. रामनगर, सातारा) तसेच श्रीकांत लक्ष्मण मानपुरी (वय २७, रा. भिवंडी, ठाणे) हे जखमी झाले. काही जखमी वाहनात अडकून पडले होते. अपघाताचा मोठा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.

अपघाताची माहिती मिळताच साखरपा पोलीस दूरक्षेत्र येथील पोलीस कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने जखमींना वाहनातून बाहेर काढून तातडीने साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी सर्व जखमींवर प्राथमिक उपचार केले असून काही जखमींना पुढील उपचारासाठी हलविण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

अपघातामुळे काही काळ रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. घाटातील रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी तत्काळ वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. अपघातग्रस्त वाहने बाजूला हटवून वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली.

घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक प्रमोद वाघाटे, पोलीस फौजदार शांताराम पंदेरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश सुतार, महिला हेड कॉन्स्टेबल मनस्वी पावसकर, कॉन्स्टेबल तानाजी पाटील तसेच महिला कॉन्स्टेबल रेश्मा चव्हाण यांनी पंचनामा केला. पोलिसांनी अपघाताची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *