राज्यपाल जिष्णू देव शर्मा यांच्या शुभहस्ते पद्मश्री दादा इदाते यांच्या जीवनकार्यावर आधारित ‘समरसतेचा वारकरी’ या मराठी पुस्तकाच्या इंग्रजी अनुवादित आवृत्ती ‘Pilgrim of Samarasata’ चे प्रकाशन दि. २० मे २०२६ रोजी लोकभवन येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.

लेखिका नीलिमा देशपांडे यांनी लिहिलेल्या ‘समरसतेचा वारकरी’ या पुस्तकामध्ये पद्मश्री दादा इदाते यांच्या सामाजिक, वैचारिक आणि संघटनात्मक कार्याचा व्यापक आढावा घेण्यात आला आहे. या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद ऋतुराज पत्की यांनी केला असून, ‘Pilgrim of Samarasata’ या नावाने ते प्रकाशित करण्यात आले आहे. मराठीतील विचारविश्व आणि सामाजिक समरसतेचा संदेश अधिक व्यापक पातळीवर पोहोचविण्याच्या उद्देशाने या अनुवादित आवृत्तीची निर्मिती करण्यात आली आहे.
कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, साहित्यप्रेमी, संघपरिवाराशी संबंधित कार्यकर्ते तसेच तरुण वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पद्मश्री दादा इदाते यांनी आपल्या मनोगतात पुस्तकामागील संकल्पना आणि प्रेरणा स्पष्ट केली. महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांनी सामाजिक समरसतेच्या दृष्टीने केलेले विविध प्रयोग, सामाजिक समरसता मंचाची उभारणी, फुले-शाहू-आंबेडकर यात्रा, रिडल्सवाद, नामांतर आंदोलन तसेच भटके विमुक्त विकास परिषद यांसारख्या अनेक महत्त्वपूर्ण चळवळी आणि विषयांचा या पुस्तकामध्ये सविस्तर आढावा घेण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.
समाजातील वंचित, भटके आणि विमुक्त घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी झालेल्या प्रयत्नांचे दस्तऐवजीकरण या पुस्तकातून झाले असल्याचेही त्यांनी सांगितले.
या पुस्तकाला मोहन भागवत यांची प्रस्तावना लाभली असून, सामाजिक समरसता आणि राष्ट्रीय एकात्मतेच्या विचारांना बळ देणारा हा ग्रंथ असल्याचे त्यांनी प्रस्तावनेत नमूद केले आहे.
यानंतर महामहीम राज्यपाल जिष्णू देव शर्मा यांच्या हस्ते पुस्तकाचे औपचारिक प्रकाशन करण्यात आले. पुस्तकाचे प्रकाशन होताच उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्याचे स्वागत केले.
आपल्या भाषणात राज्यपालांनी पद्मश्री दादा इदाते यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, समाजातील विविध घटकांमध्ये समरसता निर्माण करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर केलेले कार्य प्रेरणादायी आहे. “हे पुस्तक नव्या पिढीतील तरुणांसाठी निश्चितच मार्गदर्शक आणि प्रेरणादायी ठरेल. सामाजिक परिवर्तनासाठी कार्य करणाऱ्या प्रत्येकाने हे पुस्तक वाचले पाहिजे,” असे मत त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचा समारोप उपस्थित मान्यवरांच्या आभार प्रदर्शनाने झाला. सामाजिक समरसता, राष्ट्रीय विचार आणि परिवर्तनवादी कार्य यांचा प्रेरणादायी प्रवास उलगडून दाखविणारे ‘Pilgrim of Samarasata’ हे पुस्तक मराठीबरोबरच इंग्रजी वाचकांपर्यंतही दादा इदाते यांच्या कार्याचा परिचय करून देणारे महत्त्वपूर्ण दस्तऐवज ठरणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













