दिवा-चिपळूण मेमूचा संगमेश्वरपर्यंत विस्तार करण्याची मागणी; कोकण रेल्वेला निवेदन

banner 468x60

गणेशोत्सव आणि इतर सणासुदीच्या काळात विशेष गाडी म्हणून धावणाऱ्या दिवा-चिपळूण मेमू ट्रेनचा विस्तार करून ती कायमस्वरूपी दिवा-संगमेश्वर मार्गावर सुरू करण्यात यावी, अशी जोरदार मागणी ‘निसर्गरम्य चिपळूण आणि संगमेश्वर रेल्वे ग्रुप’च्या वतीने कोकण रेल्वे प्रशासनाकडे करण्यात आली आहे. या संदर्भातील सविस्तर निवेदन रेल्वे अधिकाऱ्यांना देण्यात आले असून, प्रवाशांच्या वाढत्या समस्यांकडे लक्ष वेधण्यात आले आहे.

banner 728x90

सध्या कोकण रेल्वेमार्गावरील अनेक स्थानकांवरून मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. विशेषतः चाकरमानी, विद्यार्थी, व्यावसायिक तसेच वैद्यकीय उपचारांसाठी मुंबई व उपनगरांमध्ये नियमितपणे प्रवास करणाऱ्या नागरिकांना आरक्षित तिकीट मिळवताना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अनेकदा गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी होत असल्याने प्रवास त्रासदायक ठरत असून, काहींना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असल्याची स्थिती निर्माण झाली आहे.

रेल्वे ग्रुपच्या निवेदनानुसार, दिवा-चिपळूण मेमू सेवा संगमेश्वरपर्यंत वाढविल्यास कामथे, सावर्डे, आरवली, कडवई आणि आसपासच्या गावांतील नागरिकांना मोठा फायदा होईल. या भागातील हजारो नागरिक दररोज रोजगार, शिक्षण, व्यवसाय आणि उपचारांसाठी मुंबईकडे ये-जा करतात. मात्र, रेल्वेच्या मर्यादित सुविधा आणि आरक्षित तिकिटांच्या कमतरतेमुळे त्यांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागतो.

मेमू सेवा ही सर्वसामान्य प्रवाशांसाठी परवडणारी आणि सोयीस्कर मानली जाते. त्यामुळे ही सेवा कायमस्वरूपी सुरू झाल्यास ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळेल, असा विश्वास रेल्वे ग्रुपने व्यक्त केला आहे. तसेच या मार्गावर प्रवाशांची संख्या मोठी असल्याने या गाडीला उत्तम प्रतिसाद मिळेल आणि रेल्वे प्रशासनालाही त्याचा फायदा होईल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

गणेशोत्सव काळात धावणाऱ्या विशेष गाड्यांना मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता, ही सेवा वर्षभर सुरू ठेवण्याची गरज असल्याचेही ग्रुपने स्पष्ट केले आहे. यामुळे चाकरमान्यांचा प्रवास अधिक सुरक्षित, सुलभ आणि वेळेची बचत करणारा ठरेल, असे मत व्यक्त करण्यात आले.

प्रवाशांच्या हिताचा विचार करून कोकण रेल्वे प्रशासनाने या मागणीवर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी ‘निसर्गरम्य चिपळूण आणि संगमेश्वर रेल्वे ग्रुप’चे प्रमुख संदेश जिमन यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *