रत्नागिरी : जिल्ह्यात दोन दिवस वादळी पावसाचा इशारा, कोकणात हवामानाचा इशारा, ताशी ५० किमी वेगाने वारे वाहणार

banner 468x60

भारतीय हवामान विभाग (IMD) यांनी दिलेल्या अंदाजानुसार रत्नागिरी जिल्ह्यासह संपूर्ण कोकण पट्ट्यात पुढील दोन दिवस वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामानातील अचानक बदलामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासन आणि हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, रत्नागिरी आणि लगतच्या भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. याचबरोबर ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहू शकतात. त्यामुळे किनारी भाग, डोंगराळ परिसर तसेच झाडे आणि वीजवाहिन्यांजवळ राहणाऱ्या नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे सांगण्यात आले आहे.

वादळ आणि विजांचा कडकडाट सुरू असताना झाडांखाली, विजेच्या खांबांजवळ किंवा उघड्या जागेत थांबू नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. तसेच शेतकरी आणि जनावरांचे पालन करणाऱ्यांनी जनावरांना सुरक्षित निवाऱ्यात ठेवावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

सध्या कोकणात आंबा हंगाम अंतिम टप्प्यात असून अनेक ठिकाणी कोकम प्रक्रिया उद्योगही सुरू आहेत. त्यामुळे आंबा बागायतदार तसेच कोकम प्रक्रिया उद्योजकांनी वादळी वाऱ्यामुळे होणारे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे हवामान विभागाने म्हटले आहे.


गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ झाल्यानंतर आता अचानक ढगाळ वातावरण तयार होत असून, मान्सूनपूर्व पावसाची ही स्थिती असल्याचे हवामान तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस नागरिकांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन प्रवास आणि शेतीची कामे नियोजनपूर्वक करण्याचा सल्ला देण्यात आला आहे।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *