रत्नागिरी जिल्हा येथे अवेळी झालेल्या पावसामुळे आंबा आणि काजू फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त क्षेत्रांचे पंचनामे करण्याचे आदेश शासनाकडून देण्यात आले असून, बाधित शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी प्रशासनाने हालचाली वेगाने सुरू केल्या आहेत.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबा आणि काजू बागायतदारांनी तातडीने ग्राममहसूल अधिकारी, सहायक कृषी अधिकारी तसेच ग्रामपंचायत अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आवश्यक कागदपत्रे जमा करावीत. यासाठी फार्मर आयडी, आधारकार्ड, सातबारा उतारा आणि बँक पासबुकची झेरॉक्स प्रत १९ मेपर्यंत संबंधित कार्यालयात सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
यंदाच्या हंगामात वातावरणातील बदलांचा फळबागांवर मोठा परिणाम झाला आहे. फुलोरा आणि फळधारणेच्या काळात पडलेल्या अवेळी पावसामुळे तसेच तीव्र थंडीमुळे आंबा आणि काजू पिकांचे उत्पादन घटले आहे. अनेक ठिकाणी मोहोर गळणे, फळांचे नुकसान होणे आणि उत्पादनक्षमतेत घट झाल्याचे चित्र दिसून आले आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
दरम्यान, अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या निकषांनुसार नुकसानग्रस्त क्षेत्रांचे तातडीने पंचनामे करून मदतीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
नुकसानाचे अचूक मूल्यमापन करण्यासाठी महसूल विभाग, कृषी विभाग आणि जिल्हा परिषद विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामस्तरावर पंचनामे सुरू करण्यात आले आहेत. यामध्ये सहायक कृषी अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी आणि ग्रामपंचायत अधिकारी सहभागी होत आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात आंबा व काजू फळबागांचे उत्पादनक्षम क्षेत्र सुमारे १ लाख ५६ हजार ९६० हेक्टर इतके असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे. नैसर्गिक आपत्तीचे स्वरूप व्यापक असल्याने पंचनामे लवकर पूर्ण करून अहवाल शासनाकडे सादर करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.
दरम्यान, पात्र शेतकरी लाभापासून वंचित राहू नयेत यासाठी सर्व बागायतदारांनी मुदतीत आवश्यक कागदपत्रे जमा करावीत, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













