राजापूर तालुक्यात शनिवारी एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोन तरुणांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या धक्कादायक घटना घडल्या आहेत. या दुहेरी घटनांमुळे संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त होत असून नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अक्षय मंगेश डुकळे (वय २८, रा. रुंढे आडीवरे) आणि राहुल राजेश माटल (वय २१, रा. कळसवली कोष्टेवाडी) अशी मृत तरुणांची नावे आहेत.
रुंढे आडीवरे येथे तरुणाने उचलले टोकाचे पाऊल
पहिली घटना रुंढे आडीवरे येथे शनिवारी सायंकाळी घडली. अक्षय मंगेश डुकळे हा युवक घरातील सदस्य बाहेर गेले असताना घरात एकटाच होता. कुटुंबातील सर्वजण गावातील लग्नाची वरात पाहण्यासाठी गेले होते. त्याचवेळी अक्षयने घरातील ओठीच्या बाजूला असलेल्या खोलीतील लोखंडी चॅनेलच्या वाश्याला साडीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली.
घटनेनंतर काही वेळाने कुटुंबीय घरी परतले असता हा प्रकार उघडकीस आला. त्यांनी तातडीने अक्षयला खाली उतरवून धारतळे प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले. प्राथमिक माहितीनुसार आत्महत्येच्या वेळी अक्षय दारूच्या नशेत असल्याचे सांगितले जात आहे.
या प्रकरणी मंगेश वासुदेव डुकळे यांनी नाते पोलीस स्थानकात खबर दिली असून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.
कळसवली कोष्टेवाडी येथे दुसरी घटना
दुसरी घटना कळसवली कोष्टेवाडी येथे शनिवारी सकाळच्या सुमारास घडली. राहुल राजेश माटल या २१ वर्षीय तरुणाने अज्ञात कारणातून राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. सकाळी सुमारे १०.३० ते १२.३० या वेळेत ही घटना घडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
राहुलने घरातील हॉलमध्ये असलेल्या लोखंडी बारला साडीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे समोर आले आहे. कुटुंबीयांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.
दोन्ही घटनांमुळे राजापूर तालुक्यात शोककळा पसरली असून तरुणांच्या वाढत्या आत्महत्यांच्या घटनांबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. या दोन्ही प्रकरणांचा अधिक तपास राजापूर पोलीस करत आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













