मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणानंतर वाढलेल्या वाहनांच्या वेगाचा आणखी एक गंभीर परिणाम हातखंबा परिसरात समोर आला आहे. भरधाव वेगातील विना नंबरचा नवा आयशर ट्रक शनिवारी मध्यरात्री हातखंबा तिठावरील रवी इन्फ्रा बिल्ड प्रोजेक्ट कंपनीच्या प्लांटसमोर रस्त्याकडेला पलटी झाल्याची घटना घडली. सुदैवाने या अपघातात जीवितहानी टळली असली, तरी महामार्गावरील वाढत्या वेगामुळे निर्माण झालेल्या धोकादायक परिस्थितीवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरीहून हातखंब्याकडे जाणारा हा आयशर ट्रक शनिवार, ९ मे रोजी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास हातखंबा तिठा परिसरात आला असता यावेळी चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक थेट रस्त्याच्या बाहेर जाऊन गटारासाठी खोदण्यात आलेल्या चरीत पलटी झाला. अपघातानंतर ट्रकच्या डावी बाजूचा भाग मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्त झाला आहे. विशेष म्हणजे, अपघाताला दोन दिवस उलटूनही संबंधित ट्रक मालकाकडून वाहन बाहेर काढण्यासाठी कोणतीही ठोस हालचाल करण्यात आलेली नसल्याचे दिसून येत आहे.

त्यामुळे पलटी झालेला ट्रक अद्याप घटनास्थळीच पडून असून, परिसरातील वाहनचालक आणि नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी तयार करण्यात आलेल्या मार्गिकांमुळे खेडशी ते हातखंबा दरम्यान वाहनांचा वेग प्रचंड वाढला आहे. या वाढत्या वेगामुळे छोटेमोठे अपघात सातत्याने घडत असून, अनेक निष्पाप नागरिकांना त्याची किंमत जीव गमावून मोजावी लागत असल्याची वस्तुस्थिती आहे. महामार्गावरील अपुऱ्या सुरक्षाव्यवस्था, वेग नियंत्रणाचा अभाव आणि बेदरकार वाहनचालक यामुळे हा पट्टा दिवसेंदिवस अधिक धोकादायक बनत चालल्याची भावना स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.

दरम्यान, अपघातग्रस्त आयशर ट्रकवर कोणत्याही प्रकारची नंबर प्लेट नसल्याचा धक्कादायक प्रकार घटनास्थळी समोर आला आहे. संबंधित ट्रक अगदी नवीन असल्याचे दिसून येत असून, नंबर प्लेटशिवाय वाहन रस्त्यावर कसे धावत होते, याबाबतही आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या प्रकारामुळे वाहतूक नियमांच्या अंमलबजावणीबाबत प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अपघातग्रस्त आयशर ट्रकवर नंबर प्लेट नसल्याचा प्रकार समोर आल्यानंतर आता आरटीओ प्रशासन नेमकी कोणती कारवाई करणार, याकडे आता लक्ष लागले आहे.
हा अपघात मध्यरात्रीच्या सुमारास घडल्याने मोठी जीवितहानी टळल्याची भावना परिसरातून आता व्यक्त होत आहे. ट्रकने ज्या दिशेने भरधाव वेगात रस्ता सोडून बाहेर झेप घेतली, त्याच ठिकाणी दिवसभर टोपल्या विक्री करणारे एक दांपत्य नियमितपणे बसत असते. त्यामुळे हा अपघात दिवसाच्या वेळी झाला असता, तर गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता आली नसती. घटनास्थळी उमटलेल्या खुणा आणि ट्रक ज्या पद्धतीने चरीत पलटी झाला, ते पाहता अपघाताचे गांभीर्य अधिक स्पष्ट होत आहे. दैव बलवत्तर म्हणूनच मध्यरात्रीच्या शांत वेळी हा अपघात घडला आणि संभाव्य अनर्थ टळला.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













