Breaking News
दाभोळ : महाडिक स्टॉप ते कोळथरे रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात, “कोकण कट्टा न्यूजच्या” वृत्ताची दखल चिपळूण : गडनदी-जामदा प्रकल्पातील देयक प्रकरणी कार्यकारी अभियंता प्रकाश जाधव निलंबित मंडणगड : रिक्षा-रुग्णवाहिका मिळेना मध्यरात्री महिलेची प्रकृती गंभीर, ‘112’ नंबरच्या कॉलवर मंडणगड पोलिसांची धावपोलिसांची तत्परता महिलेला ठरली जीवनदायी संगमेश्वर : तीन आमरण उपोषणे, 69 वर्षीय वृद्धाची आत्मदहनाच्या इशाऱ्याची पुनरावृत्ती; तरीही कुळाच्या जमिनीचा न्याय कागदावरच, देवरुख तहसीलदारांच्या आदेशाची अंमलबजावणी रखडली, निर्णय न झाल्यास उद्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा दापोली : मद्यधुंद अवस्थेत ईको कार चालवणाऱ्या चालकावर गुन्हा

रत्नागिरी : राजिवडा परिसरात घरावर आंब्याचे झाड कोसळले; मोठे नुकसान, सुदैवाने जीवितहानी टळली

banner 468x60

रत्नागिरी शहरातील राजिवडा परिसरात शुक्रवारी दुपारी घडलेल्या एका दुर्घटनेने काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. विश्वेश्वर मंदिराजवळ राहणारे राकेश पाटील यांच्या घरावर अचानक एक महाकाय आंब्याचे झाड कोसळल्याने घराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. मात्र, सुदैवाने घरातील सर्व सदस्य सुरक्षित राहिल्याने मोठी जीवितहानी टळली.

banner 728x90

मिळालेल्या माहितीनुसार, विश्वेश्वर मंदिर परिसरातील जुना आणि विशाल आंब्याचा वृक्ष अचानक उन्मळून थेट पाटील यांच्या घराच्या छतावर कोसळला. झाड कोसळताना झालेल्या प्रचंड आवाजाने परिसर दणाणून गेला. काही क्षणांतच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. या दुर्घटनेत घराच्या छतासह भिंतींचे मोठे नुकसान झाले असून घरातील साहित्याचेही नुकसान झाल्याचे समोर आले आहे.

घटनेची माहिती मिळताच माजी नगरसेवक सुहेल मुकादम यांनी तातडीने घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. शिवखोल आणि राजिवडा परिसरातील तरुण व नागरिकांनी तत्परता दाखवत मदतीचा हात पुढे केला. आपत्तीच्या प्रसंगी स्थानिकांनी दाखवलेली एकजूट आणि संवेदनशीलता याचे परिसरात कौतुक होत आहे.

दरम्यान, आणखी धोका निर्माण होऊ नये यासाठी झाड हटवण्याचे काम तातडीने हाती घेण्यात आले. स्थानिक नागरिक, मजूर आणि तरुणांच्या मदतीने कटरच्या सहाय्याने झाडाच्या फांद्या कापून हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. सुरक्षेच्या कारणास्तव काही काळ परिसरातील वीजपुरवठाही खंडित करण्यात आला होता.

“घटनेची माहिती मिळताच आम्ही तातडीने घटनास्थळी पोहोचलो. सुदैवाने घरातील सर्वजण सुरक्षित आहेत. सध्या झाड हटवण्याचे काम सुरू असून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे,” अशी माहिती माजी नगरसेवक सुहेल मुकादम यांनी दिली.

या दुर्घटनेत राकेश पाटील यांच्या घराचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून प्रशासनाने तातडीने पंचनामा करून नुकसानग्रस्त कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *