रत्नागिरी : ‘मिशन फिनिक्स’ अंतर्गत मोठी कारवाई;66 हजारांच्या ब्राऊन हेरॉईनसह एकाला अटक

banner 468x60

रत्नागिरी शहरातील अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कंबर कसत ‘मिशन फिनिक्स’ अंतर्गत धडक कारवाई सुरू केली आहे. त्याचाच भाग म्हणून रत्नागिरी शहर पोलिसांनी कोकण नगर परिसरात मोठी कारवाई करत ६६ हजार रुपये किमतीच्या ५.५ ग्रॅम ब्राऊन हेरॉईनसह एका तरुणाला अटक केली.

banner 728x90

आरमान लियाकत धामस्कर (वय २७, रा. जे.के. फाईल, रत्नागिरी) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.

रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे पथक हद्दीत नियमित गस्त घालत असताना कोकण नगर येथील साईभूमी नगर अपार्टमेंटच्या मागील बाजूस हा तरुण संशयास्पद हालचाली करताना आढळला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी व झडती घेतली असता, त्याच्याकडे विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले खाकी रंगाचे ब्राऊन हेरॉईन सापडले.

या कारवाईत पोलिसांनी ६६ हजार रुपये किमतीचा अमली पदार्थ आणि तो ठेवण्यासाठी वापरलेली प्लास्टिक पिशवी असा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक नितीन बगाटे व अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विवेक पाटील व त्यांच्या पथकातील शरद शंकर जाधव तसेच अन्य कर्मचाऱ्यांनी केली.

आरोपीविरोधात अमली पदार्थ विरोधी कायदा (एनडीपीएस) १९८५ अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

या कारवाईमुळे शहरातील अमली पदार्थ विक्रेत्यांचे धाबे दणाणले असून पोलिसांनी नागरिकांना संशयास्पद हालचाली दिसल्यास तात्काळ माहिती देण्याचे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *