श्रीवर्धन-म्हसळा मार्गावर बॉक्साईट ट्रेलरचा भीषण अपघात, पर्यटकांचे वाहन थोडक्यात बचावले

banner 468x60

संदेश घोलप, प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन–म्हसळा राज्य महामार्गावर सकलपजवळ ३० एप्रिल रोजी सकाळी घडलेला ट्रेलर अपघात पुन्हा एकदा ओव्हरलोड वाहतुकीच्या धोक्याला अधोरेखित करणारा ठरला आहे. तीव्र उतार, भरधाव वेग आणि अतिरिक्त मालवाहतूक या तिन्ही गोष्टी एकत्र आल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.


banner 728x90

मिळालेल्या माहितीनुसार, श्रीवर्धन तालुक्यातील कारविणे परिसरात मोठ्या प्रमाणात बॉक्साईट उत्खनन सुरू असून येथून दररोज जड वाहने मालवाहतूक करत असतात. ३० एप्रिल रोजी सकाळी सुमारे १० वाजता ‘Ashok Leyland’ कंपनीचा १२ चाकी ट्रेलर (क्रमांक KA 48 A 2454) बॉक्साईटने भरलेला माल घेऊन म्हसळा मार्गे जात होता.


सकलप गावाजवळील धोकादायक आणि तीव्र उतारावर येताच चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. ट्रेलर वेगाने घसरत जाऊन अचानक रस्त्याच्या मध्यभागीच पलटी झाला. अपघात इतका जोरदार होता की ट्रेलरचा मोठा भाग रस्त्यावर आडवा पडला आणि काही काळ संपूर्ण वाहतूक ठप्प झाली.


या भीषण अपघातात चालक मणिकण (वय २७) गंभीर जखमी झाला. अपघातानंतर स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. जखमी चालकाला बाहेर काढून म्हसळा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर सध्या उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

दरम्यान, या घटनेत एक मोठी दुर्घटना टळली. अपघाताच्या वेळी पुण्यातील काही पर्यटक ‘Tata Punch’ या कारने (क्रमांक MH 12 BE 7121) श्रीवर्धन–हरिहरेश्वर मार्गावरून प्रवास करत होते. ट्रेलर पलटी होत असतानाच त्यांची गाडी अगदी जवळ होती. मात्र चालकाने प्रसंगावधान राखून वेळीच गाडी थांबवली, त्यामुळे पर्यटकांचा थोडक्यात बचाव झाला.

या घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट

उसळली आहे. कारविणे परिसरातून सुरू असलेल्या बॉक्साईट उत्खननामुळे मोठ्या प्रमाणावर ओव्हरलोड ट्रेलर्सची वाहतूक सुरू असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या जड वाहनांमुळे रस्त्यांची दुरवस्था होत असून अपघातांची शक्यता वाढत असल्याचेही त्यांनी सांगितले.

नागरिकांनी महसूल विभाग आणि आरटीओ प्रशासनावर गंभीर आरोप करत म्हटले की, “ओव्हरलोड वाहतुकीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे स्थानिकांसह पर्यटकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.” विशेषतः सध्या शाळांच्या सुट्ट्या असल्यामुळे श्रीवर्धन आणि हरिहरेश्वरकडे जाणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अशा वेळी जड आणि अनियंत्रित वाहतूक ही अत्यंत धोकादायक ठरत असल्याचे नागरिकांचे मत आहे.

स्थानिकांनी प्रशासनाला इशारा देताना स्पष्ट केले की, “जर ही अवैध आणि ओव्हरलोड वाहतूक तातडीने थांबवली नाही, तर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू आणि ही वाहतूक बंद पाडू.”

दरम्यान, या अपघाताची नोंद म्हसळा पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. अपघाताचे नेमके कारण, वाहनातील मालाचे वजन आणि नियमांचे उल्लंघन झाले का, याबाबत चौकशी सुरू आहे. प्रशासनाने याप्रकरणी कडक कारवाई करावी आणि भविष्यात असे अपघात टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिकांकडून जोर धरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *