चिपळूण शहरातील काविळतळी परिसर पुन्हा एकदा गुन्हेगारी घटनेमुळे चर्चेत आला आहे. राहुल गार्डन परिसरात पैशांच्या देवाणघेवाणीच्या वादातून २९ वर्षीय तरुणाचे भरदिवसा अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली असून, या प्रकारामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या प्रकरणी प्रकाश मार्तंडराव पवार (वय ७०) यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून सातारा जिल्ह्यातील दोन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपहरण झालेला तरुण शुभम प्रकाश पवार (वय २९) असून तो काविळतळी येथील राहुल गार्डन परिसरात राहत होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम पवार याचा सौरभ चव्हाण आणि वैभव साकंडे (दोघेही रा. काळज, लोणंद, जि. सातारा) यांच्याशी काही आर्थिक व्यवहार सुरू होते. या व्यवहारातूनच त्यांच्यात वाद निर्माण झाला होता. हा वाद मागील काही दिवसांपासून सुरू असल्याची माहिती पुढे आली आहे.
बुधवार, दि. ८ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास आरोपींनी शुभमला मोबाईलवर संपर्क साधून राहुल गार्डन इमारतीखाली येण्यास सांगितले. शुभम आपल्या वडिलांसह खाली आला असता, आधीच दबा धरून बसलेल्या आरोपींनी त्याच्यावर झडप घालत कोणतीही संधी न देता त्याला जबरदस्तीने एका चारचाकी वाहनात बसवले. हा प्रकार इतक्या झटपट घडला की उपस्थितांना काही समजण्याआधीच आरोपी शुभमला घेऊन घटनास्थळावरून फरार झाले.
स्वतःच्या डोळ्यासमोर मुलाचे अपहरण होत असल्याचे पाहून प्रकाश पवार हादरून गेले. त्यांनी तत्काळ पोलिसांकडे धाव घेत तक्रार नोंदवली. या तक्रारीच्या आधारे चिपळूण पोलिसांनी आरोपी सौरभ चव्हाण आणि वैभव साकंडे यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ अंतर्गत कलम १४०(३) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने हालचाली सुरू करत संशयितांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना केली आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून आरोपींचा माग काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. अपहरणासाठी वापरण्यात आलेल्या वाहनाचा शोधही घेतला जात आहे.
भरवस्तीत आणि सायंकाळच्या वेळी घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अशा घटना रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाने गस्त वाढवावी आणि सुरक्षा उपाययोजना अधिक कडक कराव्यात, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.
दरम्यान, शुभम पवारचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असून, आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













