दापोली शहरातील गजबजलेल्या मुख्य बाजारपेठेत ४ एप्रिल रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीने काही क्षणांतच विक्राळ रूप धारण केले आणि परिसरात एकच खळबळ उडाली. या आगीत सलग पाच दुकाने पूर्णपणे जळून खाक झाली असून व्यापाऱ्यांचे अंदाजे ८० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
या आगीत दिलीप भैरमकर, परेश जैन, नाकोडा मोबाईल शॉपी, मालाराम चौधरी, अपी मोरे आणि संदीप राजपुरे या व्यापाऱ्यांची दुकाने भस्मसात झाली. दुकानांमधील मोबाईल साहित्य, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, कपडे, रोख रक्कम तसेच इतर महागडे साहित्य जळून नष्ट झाले आहे. अचानक झालेल्या या दुर्घटनेमुळे संबंधित व्यापाऱ्यांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे.
घटनेनंतर बाजारपेठ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. दुकाने एकमेकांना लागून असल्याने आणि मोठ्या प्रमाणावर ज्वलनशील साहित्य साठवलेले असल्यामुळे आगीने काही क्षणांतच वेगाने फैलाव घेतला. याशिवाय बाजारपेठेतील अरुंद रस्त्यांमुळे अग्निशमन यंत्रणेला घटनास्थळी पोहोचण्यात अडचणी निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली होती.

दरम्यान, आग लागल्याचे लक्षात येताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. अनेकांनी प्रसंगावधान राखत पाण्याच्या बादल्या, पाइप व उपलब्ध साधनांच्या सहाय्याने आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले. विशेष म्हणजे शहरातील युवकांनी मोठ्या धाडसाने पुढाकार घेत आग नियंत्रणात आणण्यासाठी अथक प्रयत्न केले. नागरिकांच्या या एकजुटीमुळे आग वेळेत आटोक्यात आली आणि संभाव्य मोठा अनर्थ टळला.

या घटनेमुळे दापोली शहरातील अग्निशमन सुविधांच्या अभावाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शहरात स्वतंत्र व सुसज्ज अग्निशमन यंत्रणा नसल्याने आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनाच पुढाकार घ्यावा लागतो, ही बाब यानिमित्ताने अधोरेखित झाली आहे.
मात्र, या पार्श्वभूमीवर सकारात्मक बाब म्हणजे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या पाठपुराव्यामुळे दापोली नगरपंचायतीसाठी नवीन अग्निशमन वाहनास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. लवकरच हे वाहन दापोलीकरांच्या सेवेत दाखल होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
या निर्णयाचे नगराध्यक्ष कृपा घाग यांनी स्वागत करत, भविष्यात अशा आपत्तींचा सामना करण्यासाठी ही सुविधा अत्यंत महत्त्वाची ठरेल, असे मत व्यक्त केले.
दरम्यान, दापोली शहर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष संदीप रामचंद्र राजपुरे यांनी नागरिकांचे आभार मानले. “आगीच्या प्रसंगी दापोलीकरांनी दाखवलेली एकजूट आणि तत्परता कौतुकास्पद आहे. आता सर्वांनी पुढाकार घेऊन नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांना आर्थिक व इतर मदत करून त्यांना पुन्हा उभे करण्यासाठी सहकार्य करावे,” असे आवाहन त्यांनी केले.
या घटनेची नोंद संबंधित यंत्रणांकडून घेण्यात येत असून आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्राथमिक तपासानुसार शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुढील तपास सुरू आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













