रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यात कौटुंबिक वादातून घडलेल्या एका धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. वेरवली डाफळेवाडी येथे सुनेने आपल्या ७५ वर्षीय सासूवर कोयत्याने हल्ला केल्याची घटना ३ एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. या हल्ल्यात वृद्ध महिला जखमी झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, जखमी सत्यवती सखाराम पवार आणि आरोपी सून स्वाती भिकाजी पवार या एकाच घरात राहत असल्या तरी त्यांचे स्वयंपाक वेगळे होते. ३ एप्रिल रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास स्वाती पवार आणि तिच्या पतीमध्ये जोरदार वाद सुरू झाला. घरातील वातावरण तणावपूर्ण झाल्याने हा वाद सोडवण्यासाठी सत्यवती पवार या शेजारी राहणारे बाळकृष्ण पवार यांच्यासह त्या ठिकाणी गेल्या.
मात्र, सासूने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केल्याचा राग मनात धरून स्वाती पवार हिने संतापाच्या भरात त्यांच्यावर शिवीगाळ करत धमक्या देण्यास सुरुवात केली. वाद अधिकच चिघळत गेला आणि अचानक स्वातीने घरातील कोयता हातात घेत सत्यवती पवार यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या कपाळाच्या डाव्या बाजूला तसेच उजव्या हाताच्या मनगटावर गंभीर जखमा झाल्या. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्यांना तातडीने उपचारासाठी हलवण्यात आले.
घटनेनंतर जखमी सत्यवती पवार यांनी लांजा पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी स्वाती पवार हिच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम ११८(१), ११५(२), ३५२ आणि ३५१(२) नुसार गुन्हा नोंदवला आहे.
या घटनेमुळे स्थानिक परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. वृद्ध महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. लांजा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













