चिपळूण : पेठमाप-मुरादपूर पुलाच्या जोडरस्त्याला गती

banner 468x60

चिपळूण शहरातील वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी वाशिष्ठी नदीवर उभारण्यात आलेल्या पेठमाप–मुरादपूर पुलाच्या अप्रोचरोडच्या कामाला अखेर वेग आला असून, येत्या पावसाळ्यापूर्वी हा पूल वाहतुकीस खुला होण्याची चिन्हे दिसत आहेत. गेल्या वर्षी पुलाचे मुख्य बांधकाम पूर्ण होऊनही केवळ जोडरस्त्याच्या मंजुरीअभावी हा प्रकल्प रखडला होता.

banner 728x90

मात्र, पावसाळ्यानंतर निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली असून, आता हे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. सुरुवातीला या कामाची गती अत्यंत संथ असल्याने नागरिकांमध्ये साशंकता होती, परंतु स्थानिक माध्यमांनी आणि जागरूक नागरिकांनी या प्रश्नावर सातत्याने आवाज उठवल्यामुळे प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली आणि कामाला गती देण्यात आली.


चिपळूण-संगमेश्वरचे आमदार शेखर निकम यांनी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी शासनाकडून मोठा निधी उपलब्ध करून दिल्याने या पुलाचे स्वप्न साकार होत आहे. चिपळूण शहराचा विस्तार आणि वाढती वाहने पाहता बाजारपेठेतील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी हा पूल अत्यंत कळीचा ठरणार आहे. या पुलामुळे गोवळकोट, पेठमाप या शहरी भागासह मिरजोळी, कोंढे, शिरळ या ग्रामीण भागातील जनतेला रेल्वे स्थानक आणि बहादूरशेख नाका येथे जाण्यासाठी सोयीस्कर व जवळचा मार्ग उपलब्ध होणार आहे.

विशेषतः पावसाळ्यात उद्भवणाऱ्या पूरसदृश्य परिस्थितीत शहरासाठी हा पूल एक सुरक्षित पर्यायी मार्ग म्हणून उपयुक्त ठरणार असल्याने, पावसाळ्यापूर्वी हा मार्ग खुला झाल्यास चिपळूणवासीयांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *