दापोली : धक्कादायक 27 वर्षीय विवाहितेची हुंड्यासाठी छळ , शारीरिक अत्याचार, मानसिक छळ आणि जीवे मारण्याची धमकी, नशेमन कॉलनीमधील गंभीर प्रकार

banner 468x60

दापोलीत भारत नगर परिसरातील नशेमन कॉलनी येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अवघ्या 27 वर्षीय विवाहितेची हुंड्यासाठी छळ , शारीरिक अत्याचार, मानसिक छळ आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.


दापोली तालुक्यातील जोगळे येथील एका विवाहितेचा हुंड्यासाठी सातत्याने शारीरिक व मानसिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, या प्रकरणी पतीसह सासरच्या पाच जणांविरुद्ध दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

नजीफा मंजूर दळवी (वय २७) यांनी यासंदर्भात दापोली पोलिसांत फिर्याद दिली आहे. आरोपींमध्ये त्यांचे पती मंजूर शकील दळवी, मुमताज शकील दळवी, शकील दिलावर दळवी, मेहनाज वाहिद महाडीक आणि कमरजहॉन शादाब मुजावर यांचा समावेश आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नजीफा यांचा विवाह ९ नोव्हेंबर २०२४ रोजी झाला होता. विवाहानंतर त्या जोगळे येथील भारत नगर परिसरातील नशेमन कॉलनी येथे सासरी राहत होत्या. मात्र, लग्नानंतर काही दिवसांतच आरोपींनी संगनमत करून हुंड्यासाठी तिचा छळ सुरू केल्याचा आरोप आहे.

फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, आरोपींनी वारंवार पैशांची मागणी करत तिच्यावर शारीरिक अत्याचार केले, तसेच मानसिक छळही केला. तिला अपमानास्पद वागणूक देत सतत दबाव टाकण्यात येत होता. याबाबत कोणालाही सांगितल्यास किंवा घरातून पळून जाण्याचा प्रयत्न केल्यास जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात येत असल्याचेही तिने तक्रारीत नमूद केले आहे.

या सततच्या त्रासाला कंटाळून नजीफा यांनी अखेर सासर सोडून चिपळूण येथे माहेरी आश्रय घेतला आहे. त्या सध्या गोवळकोट रोडवरील सलमान कॉलनी येथे राहत आहेत. दरम्यान, लग्नावेळी मिळालेले १ लाख ३० हजार रुपये रोख रक्कम आणि सुमारे १० तोळे सोन्याचे दागिने सासरच्या मंडळींनी स्वतःच्या ताब्यात ठेवून त्यांचा अपहार केल्याचाही गंभीर आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत दापोली पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम ८५, ३१६(२), ३१८(४), ११५(२), ३५१(२), ३५२ आणि ३(५) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. संबंधित आरोपींची चौकशी सुरू असून, प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

दरम्यान, या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त होत असून महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *