खेड : लोटे औद्योगिक दुर्घटना – मृतांचा आकडा तीनवर, सुरक्षेवर प्रश्नचिन्ह, लोटे स्फोटप्रकरणी मृत्यूंची मालिका सुरू

banner 468x60

लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीतील डॉ. खान केमिकल कंपनीत ६ मार्च रोजी झालेल्या भीषण रिअॅक्टर स्फोटातील जखमी कामगारांपैकी आणखी एकाचा मृत्यू झाला आहे. गंभीर भाजलेल्या ११ कामगारांपैकी सुजन गोपाल दास (वय २९) याचा सोमवारी ऐरोली येथील नॅशनल बर्न रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे या दुर्घटनेतील मृतांचा आकडा तीनवर पोहोचला आहे.

banner 728x90 banner 728x90

सुजन दास हा मूळचा पश्चिम बंगाल येथील असून गेली सुमारे ३० वर्षे तो कुटुंबासह आवाशी येथे वास्तव्यास होता. काही दिवसांपूर्वीच त्याच्या बहिणीचा विवाह पार पडला होता. मात्र, या आनंदावर विरजण पडत सुजनच्या मृत्यूची बातमी समजताच कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. मंगळवारी त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

या स्फोटात यापूर्वीच रघुनाथ खंदू खामकर (रा. मुरडे) व असद खान (रा. लातूर) यांचा मृत्यू झाला होता. उर्वरित जखमी कामगारांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली.

दरम्यान, या दुर्घटनेमुळे लोटे औद्योगिक वसाहतीतील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून कामगारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. संबंधित कंपनी व प्रशासनाने सुरक्षा उपाययोजनांबाबत तातडीने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी कामगारांकडून करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *