रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण शहरात एक धक्कादायक आर्थिक अपहार प्रकरण उघडकीस आले आहे. शहरातील नक्षत्र फॉर्मिंग ज्वेलरी या दागिन्यांच्या दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने बनावट बिल बुक आणि स्वतःचा क्यूआर कोड वापरून तब्बल १३ लाख १६ हजार ५८७ रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी दोन संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून यामुळे चिपळूणमधील व्यापारी वर्गात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी सुमित संजय शिंदे (रा. कोढे शिंदेवाडी, चिपळूण) हा संबंधित ज्वेलरी दुकानात काम करत होता. दुकानात काम करत असताना त्याने स्वतःचे एक खाजगी आणि बनावट बिल बुक तयार केले होते. या बिल बुकवर सहआरोपी सिमयंती गणेश तांबीटकर हिच्या सह्या घेऊन ते अधिकृत असल्याचा भास निर्माण करण्यात आला.
ग्राहकांना दागिने विकताना आरोपी सुमित शिंदे हा दुकानाच्या अधिकृत बिलाऐवजी स्वतःच्या खाजगी बिल बुकचा वापर करत होता. याचबरोबर पैशांच्या व्यवहारासाठी दुकानाचा अधिकृत क्यूआर कोड वापरण्याऐवजी त्याने स्वतःचा वैयक्तिक क्यूआर कोड तयार केला होता. ग्राहकांना तोच कोड स्कॅन करण्यास सांगितले जात होते. त्यामुळे ग्राहकांनी भरलेली विक्रीची रक्कम थेट आरोपीच्या वैयक्तिक बँक खात्यात जमा होत होती.
तसेच काही ग्राहकांकडून रोख रक्कम स्वीकारून ती दुकानाच्या अधिकृत हिशोबात जमा न करता स्वतःकडेच ठेवून घेतल्याचेही तपासात समोर आले आहे. अशा प्रकारे सन २०२२ पासून ते १८ नोव्हेंबर २०२५ या जवळपास तीन वर्षांच्या कालावधीत दोन्ही संशयितांनी संगनमताने एकूण १३ लाख १६ हजार ५८७ रुपयांचा अपहार केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
या प्रकरणी नक्षत्र ज्वेलरीचे हेड मॅनेजर महेंद्र मधुकर शिंदे (वय ३३, रा. रत्नागिरी) यांनी चिपळूण पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून ९ मार्च रोजी रात्री उशिरा पोलिसांनी आरोपी सुमित शिंदे आणि सिमयंती तांबीटकर यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम ३१८(४) आणि ३(५) नुसार गुन्हा नोंदवला आहे.
या घटनेमुळे चिपळूण शहरातील व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून डिजिटल व्यवहार करताना अधिक काळजी घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून अपहार केलेली रक्कम हस्तगत करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती मिळाली आहे

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*












