संगमेश्वर : अवैधरीत्या वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी महिलेसह पतीवर गुन्हा दाखल

banner 468x60

संगमेश्वर तालुक्यात एक खळबळजनक प्रकार समोर आला असून, कोणत्याही वैध कागदपत्रांशिवाय भारतात अवैधरीत्या वास्तव्य करणाऱ्या एका बांगलादेशी महिलेला आणि तिला मदत करणाऱ्या तिच्या पतीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.संगमेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आंबेड खुर्द येथील मुस्लिम मोहल्ल्यात ही कारवाई करण्यात आली.
या प्रकरणातील मुख्य आरोपी सिनेम यसफ सय्यद उर्फ शातंना अहमद खान ही मूळची बांगलादेशातील ढाका येथील रहिवासी आहे.

banner 728x90 banner 728x90

ती भारतात येण्यासाठी आवश्यक असलेली कोणतीही वैध कागदपत्रे किंवा पासपोर्ट जवळ नसतानाही बेकायदेशीरपणे वास्तव्य करत होती. तिला या कृत्यात तिचा पती यसफ महंमद सय्यद याने पूर्णपणे साथ दिल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. यसफला ही महिला परदेशी नागरिक असल्याची जाणीव असूनही त्याने तिच्याशी लग्न केले आणि तिला भारतात राहण्यासाठी सर्वतोपरी मदत केली.


इतकेच नव्हे तर, या दाम्पत्याने भारतीय यंत्रणांची दिशाभूल करण्यासाठी बनावट कागदपत्रांचा आधार घेतल्याचेही समोर आले आहे. यसफने तिला भारतीय पॅनकार्ड आणि आधारकार्ड यांसारखी महत्त्वाची ओळखपत्रे मिळवून देण्यात मदत केली. याच बनावट कागदपत्रांच्या आधारे त्यांनी कॅनरा बँकेत खाते उघडून शासनाची फसवणूक केली.


संगमेश्वर पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस कॉन्स्टेबल कोमल उत्तम ढोले यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३१८, ३३६(३), तसेच पारपत्र (भारतात प्रवेश) नियम १९५० आणि परकीय नागरिक कायदा १९४६ च्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे ग्रामीण भागात परदेशी नागरिकांच्या अनधिकृत प्रवेशाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *